बदल ही जगाची प्रवृत्ती आहे. माणसांच्या या जगाकडे पहात असता हे ध्यानात येते, की काळाच्या ओघात जसजसा विकास होत जातो, तसतसे आपल्या राहणीमानातही बदल होत जातात. आहार, विहार, पोशाख बदलत जातात. असे बदल अंगिकारण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीस असते. या व्यक्तिस्वातंत्र्याचा विवेकपूर्ण लाभ आधुनिक समाज घेत असतो. अशावेळी गणवेशाची जेथे गरज आहे असे अपवाद वगळता पोशाखांवर निर्बंध लादणे, अमूक पोशाखच परिधान करा, अशी सक्ती करणे हे व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणारे ठरते. त्यातही या प्रकारची धर्माच्या नावाने केलेली सक्ती हे पुराणमतवाद आणि कट्टरतावादाचे लक्षण मानले जाते. दुर्दैवाने अद्यापही काही इस्लामी देशात असा धार्मिक कट्टरतावाद जोपासला जातो. समाजशास्त्राrयदृष्टय़ा धार्मिक कट्टरतावादाची बांधिलकी ही पुरुषप्रधान संस्कृतीशी असल्याने स्त्राrवर्गास ती नेहमीच जाचक ठरते.
इराणमध्ये गेल्या आठवडय़ात जी घटना घडली, त्यामुळे धार्मिक कट्टरतावादाचे स्वरुप पुन्हा एकदा जगापुढे आले आहे. माहसा अमिनी ही इराणमधील कुर्दिस्तान भागात रहाणारी 22 वषीय तरुणी आपल्या कुटुंबासमवेत इराणची राजधानी तेहरानमध्ये प्रवास करीत होती. 13 सप्टेंबर रोजी गश्त-ए-इर्शाद किंवा इस्लामिक मार्गदर्शक दल म्हणून ओळखल्या जाणाऱया सांस्कृतिक पोलीस दलाने तिला अटक केली. हे दल तेथे सरकारी पातळीवर कार्यरत आहे. माहसा अमिनी हिने डोळे झाकणारे वस्त्र अर्थात हिजाब व्यवस्थित परिधान केला नाही, हे तिच्या अटकेचे कारण होते. 1979 साली इराणमध्ये जी इस्लामिक क्रांती झाली, तेव्हापासून तेथे महिलांच्या पोशाख आणि वेशभूषा संदर्भातील कडक कायदे अस्तित्वात आले. सांस्कृतिक पोलीस दलाचे काम या कायद्यांचे पालन व्यवस्थित होत आहे की नाही, हे पहाण्याचे आहे. तंग पोशाख, फाटलेल्या जीन्स, भडक रंगाचे कपडे, गुडघे दर्शविणारा पोशाख इराणमध्ये निर्बंधित आहे. महिलांनी घराबाहेर हिजाब आणि पोशाख सक्तीच्या बाबतीतील नियम भंग केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. या पार्श्वभूमीवर माहसा अमिनीवर कारवाई होणे क्रमप्राप्त होते. कारवाईसाठी सांस्कृतिक पोलीस दलाने तिला पोलीस ठाण्यात नेले आणि अवघ्या तीनच दिवसांनी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी या तरुणीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. सांस्कृतिक पोलीस दलाने अटकेच्या दरम्यान केलेल्या अमानुष मारहाणीमुळे माहसाचा मृत्यू झाल्याचा संशय याप्रसंगी व्यक्त झाला. काही सूत्रांकडून तिचे सुजलेले डोळे आणि कानातून होणारा रक्तस्राव अशा अवस्थेतील छायाचित्रेही प्रसिद्ध झाली. माहसाच्या कुटुंबियांनी अटकेपूर्वी तिचे आरोग्य अगदी उत्तम होते आणि कोणत्याही प्रकारचा आजार तिला नव्हता, असे स्पष्टीकरण दिल्याने मारहाणीच्या संशयास अधिक पुष्टी मिळाली. मात्र, इराणच्या सरकारी सूत्रांनी अशी मारहाण झाल्याचे साफ नाकारले आणि मृत्यूची इतर कारणे पुढे केली.
ही घटना घडल्यानंतर इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणमध्ये हिजाबचे बंधन झुगारून टाकण्यासाठी महिलावर्ग मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरला आहे. हिजाब जाळून टाकणे, सांस्कृतिक पोलिसांविरोधात घोषणा, सरकारविरोधात निदर्शने, हुकूमशहाचा अंत करा, अशी बॅनरबाजी या माध्यमातून गेले सात दिवस कुर्दिस्तान, तेहरान आणि इराणच्या इतर भागात आंदोलनाने पेट घेतला आहे. समाजमाध्यमातूनही इराण आणि इराणच्या बाहेरून माहसाच्या मृत्यूचा तीव्र निषेध नोंदविला जात आहे. ट्विटरवर तर या संदर्भात जगभरातून विक्रमी प्रतिक्रिया उमटल्या आहेत. युनोतील मानवाधिकार समितीने या घटनेची स्वतंत्र, सक्षम आणि निःपक्षपाती तज्ञांच्या समितीने चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आवाहन करून महिलांवरील अन्याय आणि आंदोलकांची हिंसक मुस्कटदाबी याला तेथील सरकारने त्वरित पायबंद घालावा, असे म्हटले आहे.
युरोपियन युनियनच्या विदेश नीती खात्याचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी माहसा अमिनीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून ती हत्या असल्याचे स्पष्ट करताना इराणचे हे वर्तन आधुनिक जगास साजेसे नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका जी 2015 साली ओबामांच्या काळातील इराणसह झालेला अणुकरार पुनरुज्जिवीत करण्याचा सध्या प्रयत्न करीत आहेत, तिने महिलांचा व्यवस्थेकडून होणारा छळ थांबविण्याची मागणी इराणकडे केली आहे. जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ऍनालिना बेअरबॉक इराणला ‘आंदोलनकर्त्या महिलांचे ऐका, त्यांना इतर माणसांप्रमाणे समान अधिकार हवेत आहेत’, असे सुनावले आहे. इटली, ब्रिटन आणि अनेक आशियाई राष्ट्रांकडूनही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
इराणमध्ये अलीकडच्या काळात अणुकरार उल्लंघनामुळे पाश्चात्य राष्ट्रांनी घातलेल्या निर्बंधांमुळे महागाई, बेरोजगारी, टंचाईसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
या समस्यांना घेऊन तेथे सातत्याने आंदोलने होत आहेत. शिया-सुन्नी वादामुळे या देशाचे इतर अरब देशांशी संबंध तणावपूर्ण आहेत. इस्रायल-इराण वाद या ना त्या कारणावरून पेटताच राहिला आहे. स्त्रियांवरील अत्याचारांच्या निमित्ताने अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीची जागतिक पातळीवर निंदा होत आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत जागतिक प्रक्षोभ निर्माण करणाऱया घटना घडू नयेत, याची काळजी इराणी राज्यकर्त्यांनी घ्यायला पाहिजे होती. परंतु, ती न घेतल्यामुळे आधीच संशयास्पद असलेली इराणची प्रतिमा अधिकच मलीन झाली आहे. इराण असो, अफगाणिस्तान असो वा इतर कडवे धर्मांध देश असोत, आधुनिक जगात जगाच्या पाठीवरील कोणतीही घटना सध्या लपून रहात नाही.
शिवाय गतीमान झालेल्या संपर्कामुळे आणि ज्ञान व माहितीमुळे ठिकठिकाणचे मानव समूह आपल्या अधिकार व हक्कांबद्दल जागरुक होत आहेत. या संदर्भात आधुनिक जग एकीकडे आणि आपण एकीकडे अशा प्रकारचा असमतोल अधिक काळ टिकणारा नाही. इराण, अफगाणिस्तान आणि इतर काही इस्लामी देशात धर्माच्या नावाखाली महिलावर्ग आणि नागरिकांच्या पायात अशा काही बेडय़ा अडकविल्या जातात की ज्या त्यांच्यासह त्या देशाच्या प्रागतिक वाटचालीत अडसर ठरतात. हा अडसर दूर करण्यासाठी मग अन्यायग्रस्त वर्गांकडून विद्रोह सुरू होतो. जो विकोपास जाता धर्मांध राजवटीची त्यात आहुती पडते. दमन यंत्रणा फार काळ आपला अंमल गाजवू शकत नाही. गेले सात दिवस इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाने अशा बदलाची एक झलक दाखविली आहे. – अनिल आजगावकर








