वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताच्या अर्जुन एरिगेसीने चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अमेरिकी खेळाडू ऑन्डर लियांगविऊद्ध दमदार कामगिरी केली, तर देशाच्या निहाल सरिनला जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरकडून पराभव पत्करावा लागला.
जागतिक क्रमवारीत 5 व्या क्रमांकावर असलेल्या एरिगेसीने 1 कोटी ऊपयांची इनामे असलेल्या या राउंड-रॉबिन पद्धतीने खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत पूर्ण आरंभीच पूर्ण गुण मिळवले आहे. मास्टर्स आणि चॅलेंजर्स विभागांमध्ये क्लासिकल स्वरूपात नऊ फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा खेळविली जाईल. चेन्नईचे दोन ग्रँडमास्टर्स प्रणव व्ही. आणि कार्तिकेयन मुरली यांच्यातील चांगली लढत बरोबरीत संपली, तर जागतिक क्रमवारीत यापूर्वी 6 व्या क्रमांकावर राहिलेला अनीश गिरी आणि अमेरिकी ग्रँडमास्टर रे रॉबसन यांच्यातील सामनाही अनिर्णीत अवस्थेत संपला.
आणखी एक भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजरातीलाही डच खेळाडू जॉर्डन व्हॅन फॉरेस्टने बरोबरीत रोखले. चॅलेंजर्स विभागात अव्वल मानांकित भारतीय ग्रँडमास्टरनी आपली उपस्थिती ठळकपणे दाखवली. दीप्तयन घोष, लिओन ल्यूक मेंडोन्सा आणि एम. प्रणेश यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवत सुऊवातीची गती निश्चित केली. ग्रँडमास्टर आर. वैशाली, अभिमन्यू पुराणिक आणि इनियन पा यांना बरोबरीत रोखण्यात आले, तर डी. हरिका, आर्यन चोप्रा आणि हर्षवर्धन जी. बी. यांना पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. 10 दिवसांच्या या स्पर्धेत मास्टर्स आणि चॅलेंजर्स या दोन विभागांमध्ये मिळून 20 प्रतिष्ठित खेळाडूंचा समावेश आहे आणि 2026 च्या कँडिडेट्स स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचे फिडे सर्किट गुण त्यातून प्राप्त होतील.
सध्या तिसरी आवृत्ती खेळविण्यात येत असलेल्या क्वांटबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर्सने भारतातील सर्वांत मजबूत क्लासिकल स्वरूपातील बुद्धिबळ स्पर्धा म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. ही स्पर्धा 15 ऑगस्टपर्यंत खेळविली जाणार असून सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वा. होणार आहेत.









