वृत्तसंस्था/ चेन्नई
ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी, विदित गुजराती आणि अनीश गिरी यांचा सहभाग हे 6 ऑगस्टपासून येथे सुरू होणाऱ्या चेन्नई ग्रँड मास्टर्सच्या तिसऱ्या आवृत्तीचे ठळक वैशिष्ट्या असेल. भारतातील सर्वांत प्रतिष्ठित क्लासिक बुद्धिबळाच्या या स्पर्धेत मास्टर्स आणि चॅलेंजर्स श्रेणीतील 20 खेळाडूंचा समावेश असेल. यावेळी एक कोटी ऊपयांची इनामे असतील आणि या स्पर्धेतून स्पर्धक फिडे सर्किट गुण मिळविण्याचा प्रयत्न करतील. पुढील वर्षीच्या पॅंडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र होण्याच्या दृष्टीने हे गुण महत्त्वाचे आहेत.
‘एमजीडी 1’द्वारे आयोजित आणि ‘क्वांटबॉक्स’द्वारे प्रायोजित ही स्पर्धा मास्टर्स आणि चॅलेंजर्स अशा दोन श्रेणींमध्ये विभागली जाईल एरिगेसी, गुजराती आणि गिरी यांच्याव्यतिरिक्त मास्टर्स गटातील मैदानात जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट, लियांग अवंडर, व्हिन्सेंट कीमर, रे रॉबसन, व्लादिमीर फेडोसेव्ह आणि प्रणव व्ही. यांचा समावेश असेल. ‘स्वगृही अशा उच्चस्तरीय स्पर्धेत खेळणे नेहमीच खास असते. येथील टॉप-रेटेड खेळाडू म्हणून मला माहिती आहे की, अपेक्षा खूप जास्त आहेत, पण या वर्षीचे मैदान अत्यंत स्पर्धात्मक आहे आणि प्रत्येक सामन्यात मला सर्वोत्तम कामगिरी करून दाखवावी लागेल’, असे एरिगेसी म्हणाला.
गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या चॅलेंजर्स श्रेणीमध्ये कार्तिकेयन मुरली, लिओन मेंडोन्सा, वैशाली आर, हरिका द्रोणवल्ली, अभिमन्यू पुराणिक, आर्यन चोप्रा, अधिबान भास्करन, इनियान पी., दिप्तयन घोष आणि प्रणेश एम. यांचा समावेश असेल. मास्टर्सच्य विजेत्याला 25 लाख ऊपये मिळतील, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला अनुक्रमे 15 लाख आणि 10 लाख ऊपये मिळतील. चॅलेंजर्सच्या विजेत्याला 7 लाख ऊपये आणि 2026 च्या मास्टर्स गटामध्ये स्थान मिळेल. या स्पर्धेतून फिडे सर्किट गुण मिळतील, ज्यामध्ये विजेत्याला 2026 च्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने 24.5 गुण मिळतील. संयुक्त विजेत्यांच्या बाबतीत प्रत्येकाला 22.3 गुण मिळतील, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडूंना अनुक्रमे 17.8 आणि 15.6 गुण मिळतील.









