यात्रेची जय्यत तयारी : पै पाहुण्यांचेही आगमन सुरू
वार्ताहर /नंदगड
बेकवाड गावची महालक्ष्मी यात्रा बुधवार दि. 28 पासून सुरू होणार आहे. यात्रा बुधवार दि. 6 मार्चपर्यंत चालणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे लक्ष्मीदेवी मंदिरासमोर लक्ष्मीदेवीचा विवाह सोहळा, त्यानंतर देवीची गावातील देवदेवतांना भेट, मिरवणूक होऊन मानाप्रमाणे व गावातील सर्वांच्या ओट्या भरून घेऊन सायंकाळी 5 वाजता लक्ष्मीदेवी गदगेवर बसविण्यात येणार आहे. त्यानंतर गदगेच्या ठिकाणी यात्रोत्सव होणार आहे. बेकवाड गावात लक्ष्मीदेवीच्या दोन मुर्त्या असून एकाचवेळी दोन्ही देवींचा विवाह व अन्य धार्मिक विधी पार पडणार आहेत. यात्रोत्सवाला अवघे 9 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे यात्रेपूर्वीच्या सर्व धार्मिक विधी पंचमंडळी आणि यात्रोत्सव कमिटीच्यावतीने पार पाडले जात आहेत. ग्रामस्थांचाही मोठा सहभाग या धार्मिक विधीत लाभत आहे. बेकवाड गावातीलच लोक कामधंद्यानिमित्त परगावी राहतात. तेही आपल्या कुटुंबासमवेत गावात दाखल होत आहेत. यात्रा उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात लोक गावात दाखल होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी गाव सज्ज झाले आहे. गेल्या महिन्याभरात जुन्या घरांची डागडुजी करण्यात आली आहे. नव्या व जुन्या घरांना रंगरंगोटी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्वच्छता व सुव्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. गावातील प्रमुख रस्त्यांवर विटा, वाळू, खडी ठेवण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात सदरचे साहित्य रस्त्याच्या बाजूला करावे, अशी दवंडी ग्रामपंचायतीतर्फे वारंवार देण्यात येत आहे. बेकवाड प्रवेशद्वारापासून यात्रास्थळापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. गावातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा सिमेंट काँक्रीटच्या गटारी बांधल्या आहेत. रस्त्याच्या बाजूची स्वच्छता स्थानिक लोक व ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येत आहे.









