रोटेरीयन्सचे सदस्य जॉन ओक्नेफेल्स यांचा विश्वास : भारतातील पोलिओ निर्मूलनाच्या रोटरीच्या कार्याची प्रशंसा : 94 देशांना भेटी देण्याचे ध्येय
बेळगाव : संपूर्ण जगभरातून पोलिओचे पूर्ण उच्चाटन करणे रोटरी इंटरनॅशनलचे ध्येय आहे. यासाठी जनजागृती करण्यासाठी आपण विविध देशांमधून प्रवास करत आहोत. अनेक देशांच्या सरकारलासुद्धा पोलिओ निर्मूलनाचे महत्त्व पटले असून लवकरच जगभरातूनच पोलिओ निर्मूलन यशस्वी होईल, असा विश्वास इंटरनॅशनल फेलोशीप ऑफ फ्लाईंग रोटेरीयन्सचे सदस्य जॉन ओक्नेफेल्स यांनी व्यक्त केला. जॉन आणि त्यांचे सहकारी पीटर हे सिंगल इंजिन विमानातून विविध देशांचा प्रवास करत भारतात आले आहेत. सोमवारी हे दोन्ही सदस्य बेळगावला आले असून मंगळवारी त्यांनी स्वरुप चित्रपटगृहात पत्रकारांशी संवाद साधला. रोटरी 3170 चे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांच्या पुढाकाराने आयोजित या पत्रकार परिषदेस विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे, रोटे. नरसिंह जोशी व रोटरी क्लब बेळगावचे अध्यक्ष बसवराज विभुती उपस्थित होते. जॉन म्हणाले, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, बिल गेट्स फौंडेशन, राजश्री बिर्ला, रोटरी इंटरनॅशनल व रोटरी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या काही वर्षांत पोलिओचे पूर्ण उच्चाटन करण्यात आपण यशस्वी होणार आहोत. यापूर्वी 2002 मध्ये आम्ही पोलिओ संदर्भातील जागतिक परिषदेसाठी मुंबईला आलो होतो. 2011 मध्ये भारतातून पोलिओचे निर्मूलन झाले. मात्र, पुढील तीन वर्षे वाट पाहावी लागते व त्यानंतरच पूर्णत: निर्मूलन झाल्याचे जाहीर करावे लागते. आज भारतासह अनेक देशांमध्ये पोलिओचे निर्मूलन झाले आहे.
तथापि, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळले. या देशात लस घेण्यामध्ये काहीशी उदासिनता दिसून आली. परंतु आता मात्र या देशांनीसुद्धा ही बाब गांभीर्याने घेतली आहे. सिंगल इंजिन विमानातून प्रवास करणे हे खरे तर खूप आव्हानात्मक आहे. परंतु आम्ही हे आव्हान स्वीकारले. आजपर्यंत 4 हजार 700 मैलांचे अंतर आम्ही पूर्ण केले आहे. मला स्वत:ला 1400 तास विमान प्रवासाचा अनुभव आहे. एकूण 25 हजार 323 मैलांचा आमचा हा प्रवास आहे. आजपर्यंत 35 देशांना भेट दिली असून 59 देशांना भेटी देणे आमचे ध्येय आहे. या प्रवासाची चार वर्षांपासून तयारी करण्यात आली व 5 मे रोजी आम्ही विमानो•ाण केले. या प्रवासासाठी विमानात काही बदल करून घेतले आहेत. जेणेकरून नेहमीपेक्षा जास्त इंधन साठा त्यामध्ये ठेवणे शक्य आहे, अशी माहिती जॉन यांनी दिली. भारतात रोटरीने पोलिओ निर्मूलनाचे केलेले कार्य प्रशंसनीय आहे. भारताबद्दल आम्हाला विशेष आस्था आहे. बेळगावमध्येही आमचे उत्स्फूर्त स्वागत झाले, असे सांगतानाच अनेक देशांचा प्रवास आणि खाद्य पदार्थांतील वैविध्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे भोजन मिळते. मात्र, आम्ही अत्यंत माफक आहार घेतो. भारतीय जेवण आवडते. परंतु कमी मसाल्याच्या पदार्थांना प्राधान्य देतो, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी अविनाश पोतदार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.









