राज्यपाल थावरचंद गेहलोत : विधिमंडळाच्या अधिवेशनाला प्रारंभ : 7 रोजी अर्थसंकल्प
प्रतिनिधी, वार्ताहर / बेंगळूर
राज्यात भ्रष्टाचाराचा विळखा घट्ट झाला आहे. या भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी राज्य सरकार प्रशासकीय आणि कायदेविषयक उपाययोजना करणार आहे. त्याचप्रमाणे अन्नभाग्य योजनेंतर्गत गरिबांना 10 किलो मोफत तांदूळ वितरण करून कर्नाटक भूकमुक्त राज्य बनविण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. पुढील पाच वर्षांत राज्य सरकार लोककेंद्रित अर्थव्यवस्थेवर भर देणार आहे, असे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सांगितले. सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना भाषण राज्यपाल गेहलोत यांनी राज्य काँग्रेस सरकारचे भाषण वाचून दाखविले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ झाला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे 7 जुलै रोजी वैयक्तिकपणे 14 व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सदर अधिवेशन एकूण 10 दिवस चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांनी दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण केले. ते म्हणाले, अनेक कारणांमुळे राज्यात भ्रष्टाचार विखुरला आहे. त्याचे निर्मूलन करणे आव्हानात्मक आहे. या आव्हानाला तोंड देत भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी तुमचे सहकार्य हवे, असे आवाहन राज्यपालांनी दोन्ही सभागृहातील सदस्यांना केले.
लोकेंद्रीत अर्थव्यवस्थेची अंमलबजावणी, भूकमुक्त कर्नाटक निर्मितीचा संकल्प, गॅरंटी योजनांची समर्पक अंमलबजावणी, शेतकरी, गरिबांच्या कल्याणासाठी योजना यासह दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने सरकार काम करणार आहे. ‘अन्नभाग्य’ योजनेंतर्गत राज्य सरकार 10 किलो तांदूळ वितरीत करेल. अतिरिक्त तांदूळसाठा उपलब्ध होईपर्यंत प्रत्येक दारिद्र्या रेषेखालील कुटुंबांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जाईल. सर्व गरीब कुटुंबांना अतिरिक्त पाच किलो तांदूळ मिळेपर्यंत पर्यायी खात्यात पैसे जमा करण्याची व्यवस्था सुरू राहील. सरकार अन्नभाग्य योजना आणि इंदिरा कॅन्टीनद्वारे राज्यातील जनतेला भूकमुक्त करणार आहे, असेही त्यांनी भाषणात सांगितले.
बेरोजगारांना पैसे देण्याचा प्रस्ताव
इंदिरा कॅन्टीनच्या माध्यमातून सरकार भूकमुक्त कर्नाटक राज्य निर्माण करत आहे. गरीब, कष्टकरी, स्थलांतरित कामगार इत्यादींची भूक भागवण्यासाठी इंदिरा कॅन्टीनची सुरू करण्यात आली आहेत. युवानिधी योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना पैसे देण्याचा प्रस्तावसुद्धा समोर आला आहे.
सरकार गरीब, आर्थिक मागास असणाऱ्यांच्या पाठिशी
‘गृहज्योती’ योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबाला 200 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जात आहे. सुमारे 2.14 कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी ‘गृहलक्ष्मी’ योजना लागू करण्यात आली असून या योजनेंतर्गत प्रत्येक घरातील गृहिणीच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार आहेत. आपले सरकार गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहील, असेही राज्यपाल म्हणाले.
आर्थिक संकटातून बाहेर पडणे हेच प्राधान्य
देशाच्या विकासात मोठे योगदान देणारे कर्नाटक राज्य आज आर्थिक मंदीच्या स्थितीत पोहोचले आहे. कर्नाटक राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढणे हे नव्या काँग्रेस सरकारचे प्राधान्य असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शांतीच्या तत्वाचे सरकारकडून पालन
संकुचित विचार वेगवेगळ्या समुदायांमध्ये मतभेद निर्माण करतात. समाजाच्या विविध स्तरांवर अशा मानसिकतेचे लोक अजूनही आहेत. शांततापूर्ण आणि परस्पर बांधिलकी बाळगणारा समाज निर्माण करण्यासाठी सरकार सर्व स्तरावर पावले उचलेल. राज्य सरकार महात्मा बसवेश्वर यांच्या तत्त्वानुसार प्रशासन चालवत आहे. बसवेश्वर, सर्वज्ञ यांच्यासह अनेक संतांनी प्रतिपादन केलेल्या शांतीच्या तत्त्वाचे सरकार पालन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेत्याची अनुपस्थिती
कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेचे कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवाय सुरु होत आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील विधानसभा विरोधी पक्षनेत्याच्या निवडीबाबत हायकमांड आणि प्रदेश भाजपमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी दिल्लीहून एक निरीक्षक बेंगळूरला पाठवण्यात आला आहे. मंगळवारी राज्य भाजपच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत विरोधी पक्षनेता निवडीविषयी चर्चा होणार आहे.
विधानसौधच्या 2 कि. मी. परिसरात निर्बंध
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसौधच्या 2 कि. मी. परिसरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. बेंगळूर शहर पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी हा आदेश जारी केला. विधानसौधच्या 2 कि. मी. परिसरात निदर्शने आणि उपोषणाला परवानगी नाही. या पार्श्वभूमीवर विधानसौध परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बेंगळूर सेंट्रल विभागाचे डीसीपी श्रीनिवास गौडा यांच्या नेतृत्त्वाखाली तीन डीसीपी, 15 एसीपी, 80 निरीक्षकांसह 1500 पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.









