प्रतिनिधी/ पणजी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज दि. 5 जून रोजी राज्यातील विविध सामाजिक संघटनांतर्फे मिरामार समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
पणजी महानगरपालिका आणि आयपीएससीडीएल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात सेन्सिबल अर्थ, सम्राट क्लब, एनसीसी कॅडेटस्, पुनित सागर अभियान या संघटनाही सहभागी होणार आहेत.
आज सकाळी 7 वाजता ही स्वच्छता मोहीम प्रारंभ होणार आहे. त्यावेळी मनपाचे अभियंते विवेक पार्सेकर, आयुक्त आग्नेलो फर्नांडीस, आयपीएससीडीएल च्या निकिता गडकर, पणजी सम्राट क्लबच्या प्रेरणा पावसकर, लेखा आणि कर अधिकारी सिद्धेश नाईक, पुनित सागर अभियानचे कर्नल एम. राठोड, तसेच सेन्सिबल अर्थ चे संजीव सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रदेश काँग्रेस समितीतर्फे मोलेत वृक्षारोपण
दरम्यान, याच दिवसाचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेस समितीतर्फे मोले भागात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. झाडा रोवया, गोंय सांबाळूया..! असे नाव या मोहिमेस देण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी होण्यास इच्छुकांनी सकाळी 9.30 वाजता मोले चेकनाक्याजवळ उपस्थित राहावे, असे प्रदेश काँग्रेस कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.