Kolhapur News : संग्राम काटकर,कोल्हापूर
करवीर निवासिनी अंबाबाईला अभिषेक केल्याने भाविकांना देवीच्या सेवेचे समाधान लाभते. कुलदेवीचे स्मरणही अभिषेकातून होऊन जाते. मनोकामना पूर्णत्वाला गेल्या प्रित्यर्थ अंबाबाईला केला जाणारा अभिषेकही भाविकांना सुखावणारा असतो. आता याचा आत्मिक सुखाला पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाली आहे. अंबाबाईला अभिषेक करणाऱ्या भाविकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती व सह्याद्री देवराई यांच्याकडून देशी झाडांचे रोप दिले जात आहे.गेल्या दिवाळीपासून सुरु केलेल्या या उपक्रमातून तीन हजारहून अधिक रोपांचे वाटप भाविकांना केले आहे.या रोपांची लागवड शेतामध्ये अथवा घराजवळ करुन त्यातून भाविक उत्पन्न मिळवू शकणार आहेत.
दर 10 मिनिटाला महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटक अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात.यापैकी अनेकजण मनोकामना पूर्वणत्वाला गेल्याबद्दल अथवा आत्मिक समाधानासाठी मंदिरातील गरुड मंडपात देवीच्या उत्सवमूर्तीवर अभिषेक करतात.अभिषेकानंतर भाविकांना अंबाबाईचा प्रसाद म्हणून श्रीफळ दिले जाते.गेल्या काही वर्षापासून अभिषेक करणाऱ्यांची संख्या शेकड्यात गेली आहे.याचा अंदाज बांधून अभिषेक केल्यानंतर भाविकांना श्रीफळऐवजी देशी झाडांचे रोप देण्याची संकल्पना सह्याद्री देवराईचे संस्थापक व अभिनेते सयाजी शिंदे यांनी देवस्थान समितीकडे यंदाच्या नवरात्रोत्सवात मांडली होती. शिंदे यांच्या संकल्पनेतील गांभिर्य जाणून पर्यावरण संवर्धनाच्या जागरात देवस्थान समितीबरोबरच भाविकांचाही सहभाग रहावा,म्हणून समितीने वृक्षप्रसाद योजना हाती घेतली.रोज अंबाबाईला अभिषेक करणाऱ्या भाविकांची संख्या डोळ्यासमोर ठेवून वर्षाला किती रोपांचे वितरण करायचे हे पक्के केले.
भाविकांना दिली जाणारी ही रोप म्हाळुंग,पारिजातक,लिंबू,जास्वंद,मधुमालती,शमी,तुळस,कडीपत्ता,गावटी अंबा,हादगा,शेवगा,बेल,ताम्हण,जांभुळ,अर्जुन व तुतू यासह विविध देशी रोपच देण्याचे नियोजन केले.
नुकत्याच झालेल्या दिवाळी सणापासून अंबाबाईला अभिषेक करण्यासाठी जे जे भाविक येतील,त्यांना अभिषेक केल्यानंतर अंबाबाईचे प्रिय फळ असलेल्या म्हाळुंगाच्या झाडासह वरील सर्व देशी रोपांचे रोपांचे वितरण करण्यास प्रारंभ केला. या रोपाकडे अंबाबाईचा प्रसाद म्हणून पाहा असे सांगताना देवीची आठवण म्हणून मिळालेले रोप शेत,घराच्या गार्डनमध्ये अथवा कुठेही लावून ते वाढवा,अशी विनंतीही केली जात आहे.शिवाय ही रोपे उत्पन्न मिळवून देण्याबरोबरच त्यांचे पर्यावरणाच्यादृष्टेने इतर फायदेही भाविकांना सांगितले जातात.गेल्या 33 दिवसात तब्बल तीन हजारांहून अधिक अभिषेक केलेल्या भाविकांना रोपांचे वितरण केले आहे.भाविकही अंबाबाईचा प्रसादरुपी मिळालेले रोप वाढवायचे असा निश्चय करुन माघारी परतत आहेत.
प्रत्येक महिन्याला तीन ते साडे तीन हजार रोपे वाटप करण्याचे नियोजन देवस्थान समितीने केले आहे. कागलमधील सामाजिक वनीकरण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नर्सरीतून देशी रोपे अंबाबाई मंदिरात आणली जात आहेत. रोपांचे पैसे सह्यादी देवराईकडून भागवले जात आहे. रोप वाटपात खंड पडू नये, यासाठी देवस्थान समिती 50 हजार झाडांची व्यवस्था करणार आहे.
शिवराज नाईकवाडे (सचिव, देवस्थान समिती)
Previous Articleबल्लारपूर रेल्वे स्थानकातील पूल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर
Next Article डेंटल क्लिनिकमध्ये कर्मचाऱ्यांनी घेतले गळफास !!!








