वार्ताहर/जांबोटी
गेल्या चार-पाच दिवसापासून खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे रताळी वेल लागवडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जांबोटी, बैलूर परिसरातील शेतकरी वर्ग रताळी लागवडीच्या कामात गुंतला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात मे महिन्यामध्येच मान्सूनपूर्व पावसाने शेतकरी वर्गांना बऱ्यापैकी साथ दिल्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले होते. जांबोटी, बैलूर परिसरातील शेतकरी वर्ग माळरानावरील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात रताळी लागवड करतात. रताळी हे या भागातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. त्यापासून शेतकरी वर्गांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळतो. रताळी लागवडीसाठी आवश्यक वेलींची लागवड पाणथळ शेतवडीमध्ये फेब्रुवारी, मार्च महिन्यातच करण्यात येते. तसेच रताळी लागवडीसाठी आवश्यक जमिनीची नांगरट मे व जून महिन्याच्या प्रारंभी करून माळरानावरील जमिनीत रताळी लागवडीसाठी मेरा ओढून त्यावर रताळी वेलींची लागवड करण्यात येते. रताळी लागवडीसाठी संततधार पावसाची आवश्यकता असते. चार-पाच दिवसापासून या भागात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रताळी पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी वर्ग हंगाम साधण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.









