नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दुसरा टप्पा येत्या जूनपासून
पणजी : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दुसरा टप्पा गोव्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2023-24 पासून सुऊ करण्यात येणार आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना नर्सरीत तर 6 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना प्राथमिक शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. दि. 1 जून 2023 रोजी 3 वर्षे पूर्ण झालेल्यांना नर्सरीत प्रवेश देण्यात येणार आहे. पुढील वर्षी के. जी. 1 ला 4 वर्षे पूर्ण झालेल्यांना प्रवेश मिळणार आहे. त्याच्या पुढील वर्षी के.जी. 2 साठी 5 वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे, तर पहिलीसाठी 6 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे. यंदा नर्सरीपासून शैक्षणिक धोरण अंमलात आणण्यात येणार असून वयाचा निकष नर्सरीसाठी 3 वर्षे ठेवण्यात आला आहे. मागील वर्षी नर्सरीत असलेल्यांना यंदा के.जी. 1 प्रवेश मिळणार आहे. गेल्या वर्षी के.जी.1 मध्ये असलेल्या आता के.जी.2 मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी के.जी. 2 मध्ये असलेली मुले आता नवीन शैक्षणिक वर्षात पहिलीत जाणार आहेत, अशी माहिती झिंगडे यांनी दिली आहे. नवीन धोरणात ठरलेल्या वयाच्या निकषानुसारच प्रवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.









