सातारा :
सातारा शहरात शिवतीर्थ परिसरातील होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ग्रेड सेपरेटर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यावधी रुपये खर्चुन बांधला गेला आहे. परंतु हा प्रकल्प बांधून पूर्ण होताच फेल गेल्याच्या अनेकदा चर्चा साताऱ्यात रंगल्या. काहींनी या प्रकल्पात त्रुटी असल्याचे वारंवार जाहिर केले. दरम्यान, पावसाळा सुरु झाला अन् गेल्या पाच दिवसांपासून ग्रेड सेपरेटर पाऊस आला की वाहतुकीला बंद ठेवण्यात येतो. पालिका आणि वाहतूक शाखा यांच्याकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
सातारा शहराची वाढती लोकसंख्या, रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या, होणारे अपघात यामुळे पोवई नाका परिसरात अगोदर उड्डाणपुल करण्याची मागणी झाली होती. महाराजा सयाजीराव विद्यालय परिसर व आकार हॉटेलच्या समोर या दोन ठिकाणी अपघात त्या काळात घडले होते. तत्कालिन प्रशासनाच्यावतीने मागणीनुसार ग्रेड सेपरेटर करण्याबाबत हालचाली करुन ग्रेड सेपरेटरचा प्रकल्प पूर्ण केला. त्याकरता कोट्यावधी रुपयांचा निधीही बांधकाम विभागाकडून खर्च केला. मात्र, बांधकाम विभागाकडून तो लोकार्पण झाल्यानंतर एक ते दोन वेळा रस्ता खराब झाल्याची घटना घडली होती. त्यावर लगेच बांधकाम विभागाकडून भराव टाकून तो दुरुस्ती केला होता. अलिकडच्या पाच दिवसांमध्ये ग्रेड सेपरेटरमधील वाहतूक पाऊस पडल्यानंतर बंद ठेवण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे ग्रेड सेपरेटरमध्ये निसरडे बनले आहे. वाहने घसरल्याच्या घटना घडल्या गेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने लगेच अग्निशामक दलाच्या बंबाकडून पाणी मारुन सफाई केली होती. त्यानंतर वाहतूक शाखेकडूनही दोन्ही बाजूला बॅरिकेट लावून दुचाकीकरता वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे. तसेच वॉर्डन ठेवून दुचाकी वाहनांसाठी उपाययोजना करण्यात येत आहे.
- वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी अधूनमधून वाहतूक ठेवली जाते
ग्रेड सेपरेटरमध्ये वाहने घसरण्याच्या घटना घडत असल्याने अधूनमधून वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येते. ही काळजी सातारकरांच्यासाठी वाहतूक शाखेच्यावतीने घेतली जाते.
एपीआय अभिजित यादव,वाहतूक शाखा सातारा शहर
- पालिकेकडून दक्षता
सातारा नगरपालिकेकडे ग्रेड सेपरेटरचा मेंटनेस राखण्याची जबाबदारी असून आता पालिकेकडून दक्षता घेतली जाते. ग्रेड सेपरेटरमध्ये दोन ठिकाणी गटरमध्ये साईडचा सिमेंटचा बॉक्स अडकला आहे. तोही काढण्याची कार्यवाही केली गेली. काही वेळा लाईट्स बंद असतात. त्याही दुरुस्ती करण्याचे काम पालिकेकडून करण्यात येते. घसरडे होते त्या पार्श्वभूमीवर पाणी मारुन वाहनांच्या टायरने आलेली माती धुवून काढण्यात येते.








