वृत्तसंस्था / संभल
उत्तर प्रदेशातील संभल येथे मशीद सर्वेक्षणाच्या मुद्द्यावर मोठी धार्मिक दंगल झाल्यानंतर आता तेथे तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, कायदा-सुव्यवस्था परिस्थिती बिघडू नये यासाठी बाहेरच्या लोकांना संभलमध्ये येण्यावर 10 दिवसांची बंदी घातल्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारने काढला आहे. या आदेशाला समाजवादी पक्षाने विरोध केला असून कोणत्याही परिस्थितीत संभलला भेट देणारच अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे तणावात भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने संभलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न शनिवारी केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला. पोलिस मनमानी करीत असल्याचा आरोप या पक्षाने केला आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाने कुशासन चालविले आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने संभलमधील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम थांबले आहे. मात्र, या प्रकरणी उच्च न्यायालयाने निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आता अलाहाबाद उच्च न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 8 जानेवारीच्या आत ही सुनावणी होऊन निर्णय येण्याची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 8 जानेवारीला ठेवण्यात आली आहे. संभल येथील दंगलीत पाच दंगलखोरांचाच मृत्यू गोळीबारात झाला होता.









