29.18 टक्के हिस्सेदारी घेण्याची घोषणा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अदानी ग्रुप एनडीटीव्ही मीडिया समुहातील 29.18 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. अदानी ग्रुपची कंपनी एएमजी मीडिया नेटवर्कद्वारे हा व्यवहार केला जाणार आहे. एएमजी मीडिया नेटवर्क लिमिटेडची (एएमएनएल) सहाय्यक कंपनी व्हीपीसीएलद्वारे हिस्सेदारी खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अदानी मीडिया नेटवर्कचे सीईओ संजय पुगलिया यांनी पत्र जारी करत यासंबंधी माहिती दिली आहे.
अदानी ग्रुपच्या एएमजी मीडियाने एनडीटीव्हीत 26 टक्के अतिरिक्त हिस्सेदारी खरेदी करण्याचाही प्रस्ताव मांडला आहे. अदानी ग्रुपने एनडीटीव्हीमध्ये 294 रुपये प्रतिसमभाग या मूल्याने 26 टक्के हिस्सेदारीसाठी 493 कोटी रुपयांची ओपन ऑफर दिली आहे. या पार्श्वभूमीवर एनडीटीव्हीचा समभाग मंगळवारी 5 टक्क्यांनी वधारला आहे.
दीर्घकाळापर्यंत कोळसा तसेच पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केल्यावर अदानी ग्रुप आता तांदळापासून ट्रव्हल पोर्टल, मीडिया, ग्रीन एनर्जी आणि सिमेंट कंपन्यांचे अधिग्रहण करत स्वतःच्या उद्योगव्यवसायाला वैविध्य प्राप्त करून देत आहे. मागील वर्षभरात अदानी ग्रुपने 1.31 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे 32 हून अधिक व्यवहार केले आहेत. आशिया-प्रशांत क्षेत्रात सर्वाधिक कंपन्यांचे अधिग्रहण करणाऱया समुहांमध्ये याची गणना होत आहे.









