राष्ट्रीय सुरक्षेला दिला दाखला
वृत्तसंस्था / लक्षद्वीप
लक्षद्वीप प्रशासनाने गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षेचा दाखला देत एकूण 36 बेटांपैकी 17 बेटांवर प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. या 17 बेटांवर कुठल्याही प्रकारची नागरी वस्ती नाही तसेच तेथे ये-जा करण्यासाठी उपविभागीय न्यायदंडाधिकाऱयाकडून अनुमती घेणे आवश्यक आहे.
लक्षद्वीप जिल्हाधिकाऱयांनी यासंबंधी भादंविचे कलम 144 अंतर्गत औपचारिक अधिसूचना जारी केली आहे. दहशतवादी किंवा तस्करीची कृत्ये रोखण्यासाठी या बेटांवर प्रवेश करण्यास बंदी घालण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला होता.
या बेटांवर अवैध, समाजकंटक आणि देशविरोधी कारवायांमध्ये सामील गुन्हेगार असू शकतात, याचमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नागरी वस्ती नसलेल्या बेटांवर मजुरांसाठीची निवासस्थाने आहेत. याचमुळे या मजुरांसोबत देशविरोधी कृत्यांमध्ये सामील गुन्हेगार देखील तेथे असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाने स्वतःच्या आदेशात म्हटले आहे.
दहशतवादी संघटना किंवा गटांकडून देशाच्या महत्त्वपूर्ण संस्था तसेच गर्दीयुक्त ठिकाणांवर हल्ला करण्याची शक्यता पाहता खबरदारीदाखल उपाययोजना आवश्यक आहेत. देशाच्या महत्त्वपूर्ण सैन्य, निमलष्करी, औद्योगिक आणि धार्मिक ठिकाणांवर हल्ले घडवून आणत लोकांमध्ये भय आणि दहशत निर्माण करण्याचे कट हाणून पाडण्यासाठी लक्षद्वीपच्या 17 बेटांवर विनाअनुमती प्रवेशावर बंदी घातली जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.









