उद्या नवरात्रीला प्रारंभ : अंबाबाईच्या दर्शनास 20 ते 25 लाख भाविक येण्याची शक्यता : जोतिबाचा 2 रोजी तर करवीर अंबाबाईचा 3 रोजी जागर, 5 ऑक्टोबरला शाही दसरा
प्रतिनिधी/कोल्हापूर
हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व असलेल्या आणि नवदुर्गांची उपासना करण्याची भावना जनमाणसांच्या मनामनामत रुजवणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवाला सोमवार 26 रोजीपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी, जोतिबा, वाडीतील दत्तात्रय यांच्यासह जिह्यातील सर्व देवतांच्या मंदिरे उत्सव साजरा करण्यासाठी सर्व बाजूंनी सज्ज झाला आहे. देवदेवतांच्या दर्शनास परराज्यातून 20 ते 25 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने यात्रीनिवास व हॉटेल्सही तुंडूंब भरून जाणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही निर्बंध नसल्याने शहरासह जिह्यातील मंडळांकडून उत्सवाच्या पहिल्याच दिवसांपासून रास-दांडिया, भाव व भक्तीगीतांच्या कार्यक्रमांसह भजन, किर्तन, प्रवचनांचे आयोजन केले जाणार आहे. अशा सगळ्या वातावरणातच उत्सवाच्या पाचव्या माळेला म्हणजेच शुक्रवारी (दि. 30) ललिता पंचमीचा सोहळा साजरा केला जाईल. टेंबलाई टेकडीवरील टेंबलाई मंदिरातील कोहळा पूजनाचा विधीही तर पूर्णपणे निर्बंधमुक्त केला जाणार आहे. कोहळा पुजन विधीसाठी करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजा भवानी व गुरु महाराजांची पालखी गतवर्षाप्रमाणे वाहनातून नव्हे तर पायी टेंबलाई टेकडीवर दाखल होणार आहेत. रविवारी 2 रोजी जोतिबाचा तर सोमवार 3 रोजी अंबाबाईचा जागर केला होईल. याचबरोबर 5 ऑक्टोबर विजया दशमीचा सोहळा साजरा होईल. ऐतिहासिक दसरा चौकात सायंकाळी गोरज मुहूर्तावर साजरा केल्या जाणाऱ्या शाही दसऱ्यातून सोनंही लुटलं जाईल.
हे ही वाचा : आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच सोनं लूटणार – दीपक केसरकर
दरम्यान, अवघ्या दोनच दिवसांवर नवरात्रौत्सव येऊन ठेपल्याने शिवाजी पेठेतील फिरंगाई, महाकाली, कमलजा, मंगळवार पेठेतील पद्मावती, दुधाळी परिसरातील अनुकामिनी, ब्रह्मपुरीवरील गजेंद्रलक्ष्मी, कात्यायणी येथील कात्यायणी मंदिर, उजळाईवाडीतील उजळाईदेवी, वाडीरत्नागिरीवरील जोतिबा मंदीर, नृसिंहवाडीतील दत्तमंदिर, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, आळते येथील रामलिंग, सादळे-मादळे येथील सिद्धोबा, सांगरुळ येथील जोतिबा, सातेरी, बीड येथील कल्लेश्वर व आदमापूर येथील बाळूमामांचे मंदिर यासह जिल्ह्यातील अनेक लहानमोठय़ा मंदिरांना रंगरंगोटी व विद्युत रोषणाईने नटवण्यात आली आहे. पर्यटकांच्या दर्शन कार्याला शिस्त लागावी, यासाठी मंदिरांनी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र दर्शन रांगा तयार केल्या आहेत. या दर्शनाच्यानिमित्ताने येणाऱ्या भाविकांचा अंदाज घेऊन मंदिरापरिसरात मनोरंजनात्मक खेळांसह फुले, हार, विधीचे साहित्य खेळणी, खाद्य पदार्थची विक्री करणारे स्टॉलही उभारले आहे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, मंदिरे भाविकांनी फुलणार…
करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनास महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक येतील, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनेच गृहित धरले आहे. त्यानुसार दर अर्ध्या तासात प्रत्येक भाविकाला अंबाबाईचे दर्शन मिळेल, असे नियोजन समितीने केले आहे. अंबाबाईच जसे भाविकांना दर्शन घडेल, तसे ते जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी देत देत देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये एकत्र येऊ लागतील. त्यामुळे सहाजिकच पर्यटन व धार्मिकस्थळे अक्षरशः गजबजून जाणार आहेत.