सातव्या दिवशीही मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी : दौडमधून तरुण-तरुणींमध्ये देशप्रेमाचे बीज
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅम्प परिसरात शनिवारी झालेल्या दौडचे फुलांच्या उधळणीत स्वागत करण्यात आले. देव, देश आणि धर्मासाठी काढल्या जाणाऱ्या दुर्गामाता दौडचे सर्व धर्मियांनाच कौतुक आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला धर्मसंस्कार देण्यासाठी काढल्या जाणाऱ्या या दुर्गामाता दौडमध्ये सातव्या दिवशीही मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. ‘शिवबानं सांगावा धाडलाय रं, देशासाठी लढायचं रं’ असे म्हणत तरुण-तरुणींमध्ये देशप्रेमाचे बीज दौडमधून रोवले जात आहे.
सातव्या दिवशीच्या दौडला मिलिटरी महादेव येथील महादेव मंदिरापासून सुरुवात झाली. एस. के. पाठक यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. प्रेरणामंत्र म्हणून दुर्गामाता दौडला सुरुवात झाली. कॅम्प येथील प्रमुख मार्गांवरून फिरून जत्तीमठ येथील दुर्गादेवी मंदिरात सांगता झाली. यावेळी विजयराव देशमुख लिखित ‘शककर्ते शिवराय’ या पुस्तकाबद्दल नागपूर येथील छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे मंगेश बरबडे, मनीष उधव, राम देशपांडे यांच्यावतीने माहिती देण्यात आली. शिवप्रतिष्ठानचे प्रचारक हिरामणी मुचंडीकर यांनी गोहत्या व दुर्गामाता दौडचे आयोजन का केले जाते? या विषयी माहिती दिली. उद्योजक शिरीष गोगटे व मुकेश कामटे यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.
कॅम्प येथे मुस्लीम बांधवांकडून स्वागत
कॅम्प येथे सर्व जाती-धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळेच दुर्गामाता दौडचे मुस्लीम बांधवही स्वागत करतात. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही कॅम्प येथे मुस्लीम बांधवांनी जल्लोषात स्वागत केले. कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी सदस्य साजिद सय्यद व त्यांच्या कुटुंबीयांनी ध्वजाला हार अर्पण केला. तसेच धारकऱ्यांना मिठाईचे वाटप केले. जातीय सलोखा राखण्याचे हे उदाहरण कौतुकास पात्र आहे.
सोमवार दि. 23 च्या दौडीचा मार्ग
ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरापासून दौडला प्रारंभ होणार आहे. फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनिमंदिर रोड, मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, मुजावर गल्ली, कांगली गल्ली, स्टेशन रोड, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली रोड, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, महाद्वार रोड, तानाजी गल्ली, समर्थनगर चौथा व पाचवा क्रॉस, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिर, कपिलेश्वर ओव्हरब्रिजमार्गे शनिमंदिर येथे सांगता होणार आहे.