मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत प्रचंड गर्दी : कोटय़वधीची उलाढाल
प्रतिनिधी /बेळगाव
रंगीबेरंगी फुलांनी फुललेला फूलबाजार, हिरव्यागार आणि अनेक रंगांच्या भाज्यांमुळे बहरास आलेली भाजीमंडई, खतखत्यासाठी आवर्जून विविध भाज्यांची निवड करणारे ग्राहक, प्राधान्याने महिलावर्ग, झिरमिळय़ा, रंगीत चेंडू, प्रकाश परिवर्तीत करणाऱया विद्युतमाळा आणि सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी आणि ओसंडून वाहणारा उत्साह…. यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरात ठिकठिकाणी लहान जत्राच भरल्याचे चित्र दिसून आले.
शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेसह शहापूर, वडगाव, टिळकवाडी, अनगोळ आणि उपनगरे अशा सर्वच ठिकाणी नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. यावषी निर्बंधांविना गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. बाप्पांच्या आगमनामध्ये कोणतीही कसर राहू नये, यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. गणेशोत्सव मंडळांकडून आगमन सोहळा आयोजित करत वाजतगाजत गणराया मंडपापर्यंत आणला जात आहे. तर बाजारपेठांमध्येही खरेदीला उधाण आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत बाजारात खरेदीसाठी गर्दी होती. शहराच्या मध्यवर्ती भागातील गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, कलमठ रोड, शनिमंदिर रोड, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली येथे तुडुंब गर्दी झाली होती. फळ-फळावळे, नारळ, फुले, आंब्याच्या डहाळय़ा, केळीची पाने, हळदीची पाने, अगरबत्ती, धूप, कापूर, मखर, सजावटीचे साहित्य, पडदे, तोरण, लायटींगच्या माळा खरेदी केल्या जात होत्या. बेळगाव शहरात मागील दोन दिवसांपासून होणारी गर्दी पाहता अनेक नागरिकांनी उपनगरांमध्येच खरेदी केली. त्यामुळे यावषी उपनगरांमध्येही खरेदीसाठी गर्दी झाली होती. शहापूर येथील नाथ पै चौकपासून बँक ऑफ इंडिया कॉर्नरपर्यंत लहान विपेते रस्त्याशेजारी गणेशोत्सवाचे साहित्य विक्री करीत होते. त्यामुळे या परिसरात गर्दी झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर वडगाव येथील बाजार गल्ली, खासबाग परिसर, जुने बेळगाव, अनगोळ येथील संभाजी गल्ली, आरपीडी चौक, कॅम्प, शाहुनगर, गांधीनगर या परिसरात खरेदीचा उत्साह दिसून आला.
पावसामुळे हिरमोड
मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी 10.30 नंतर पाऊस दाखल झाल्याने ग्राहक व विपेत्यांचा हिरमोड झाला. लहान विपेत्यांनी दुकाने थाटली होती. परंतु पाऊस दाखल झाल्याने व्यापार होणार नाही, या चिंतेने व्यापारी त्रस्त झाले होते. परंतु दुपारी 12 नंतर पाऊस कमी होऊन कडक ऊन पडले. त्यामुळे दुपारनंतर खरेदीचा उत्साह दिसून आला. ग्रामीण भागातून येणारे नागरिकही दुपारनंतर दाखल झाल्याने गर्दी झाली होती.
गणेशमूर्तींवर शेवटचा हात
बुधवारी गणेश चतुर्थी असल्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेशमूर्तींचे अंतिम रंगकाम केले जात होते. काही भाविक एका दिवसापूर्वीच गणेशमूर्ती आपल्या घरी घेऊन जात असल्याने मूर्तिकारांची धावपळ सुरू होती. त्यातच परगावच्या मूर्तीदेखील गुरुवारी त्या-त्या गावांना रवाना झाल्या. मागील चार ते पाच महिन्यांपासून मूर्ती बनविण्यासाठी सुरू असलेली धावपळ मंगळवारी रात्रीही दिसून आली. बेळगाव जिल्हय़ासह शेजारील कोल्हापूर, सांगली, गोवा, हुबळी या परिसरात गणेशमूर्ती नेण्यात आल्या.
बाप्पांच्या नैवेद्यासाठी मागील दोन दिवसांपासून मोदकांनी स्वीटमार्ट दुकाने सजली आहेत. विविध फ्लेवर्समधील मोदक भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. काजू, पिस्ता, शुगरलेस, स्ट्रॉबेरी, बंगाली, बदाम, मोतीचूर, केसर, आंबा, मिल्क, कोकोनट, अंजीर, काजू केसर, काजू स्ट्रॉबेरी, पंचरतन अशा विविध फ्लेवर्समध्ये मोदक बाजारात दाखल झाले आहेत. मंगळवारी शहरातील स्वीटमार्टमध्ये मोदक खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर नोकरदार महिलांची संख्या अधिक असल्यामुळे धावपळीत पुरणपोळय़ा करणे शक्मय होत नाही. त्यामुळे तयार पुरणपोळी खरेदी केली जात होती. यावषी पुरणपोळय़ाही विविध फ्लेवर्समध्ये दाखल झाल्या आहेत. डाळ पुरणपोळीसह नारळ, खजूर, खवा, गाजर, शेंगदाणा, गुलकंद, ड्रायप्रुट अशा विविध प्रकारात पुरणपोळय़ा खरेदी केल्या जात होत्या.
गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी बालचमू फटाक्मयांची खरेदी करताना दिसत होते. गणपत गल्ली, मारुती गल्ली, मेणसे गल्ली, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली, बापट गल्ली, किर्लोस्कर रोड, काकतीवेस याठिकाणी वाढती गर्दी होती. कोरोनानंतर यंदा बाजारपेठ बहरल्याने भक्तांचा उत्साह वाढला आहे. बेळगावमध्ये चंदगड, खानापूर, हुक्केरी, गडहिंग्लज आणि बऱयापैकी गोवा येथून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक होती. यंदा विविध साहित्याची खरेदी अधिक प्रमाणात झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.









