वार्ताहर /दाभाळ
शिवसाई स्वयंसाहाय्य गट चाफळवाडा बेतोडा आणि आयकेअर ऑप्टिकल माशेल यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिराल उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेस्तवाडा बेतोडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात हे शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयंती नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिवसाई स्वयंसाहाय्य गटाच्या अध्यक्ष शर्मिला गावकर, पदाधिकारी सुषमा गांवकर, शांती गांवकर, रेश्मा सतरकर, नयन गांवकर, आयकेअर ऑप्टिशनच्या डॉ. ममता खेडेकर, डॉ. दीपाली खेडेकर, मदतनीस करिष्मा खेडेकर, अक्षता खेडेकर, योगेश खेडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय उपचारासाठी शहरातील इस्पितळात जावे लागते परंतू काही आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना ते शक्य होत नाही त्यांना अशी शिबिरे फार उपयुक्त ठरतात. त्यांचा लाभ येथील नागरिकांनी करून घ्यावा, असे जयंती नाईक यावेळी बोलताना म्हणाल्या. बेतोडा सारख्या ग्रामीण भागात शिवसाई स्वयंसाहाय्य गटाने नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करून येथील नागरिकांची चांगली सोय केल्याबद्दल शिवसाई गटाबद्दल त्यांनी प्रशंसा केली. इतर अवयवांबरोबरच डोळे ही खूप महत्त्वाचे असून डोळ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी वर्षातून एकदा तरी डोळे तज्ञ डॉक्टरांकडून तपासून घ्यावे, असे आवाहन डॉ. ममता खेडेकर यांनी केले. डॉ. ममता खेडेकर व डॉ. दीपाली खेडेकर यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना करिष्मा खेडेकर, अक्षता खेडेकर व योगेश खेडेकर यांनी साहाय्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गांवकर यांनी केले तर आभार सुषमा गांवकर यांनी मानले. सुमारे 60 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.









