विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
वार्ताहर /नंदगड
संविधान अंमलबजावणीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 जानेवारीपासून सर्वत्र संविधान जागृती रथयात्रा सुरू आहे. ही रथयात्रा 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालणार आहे. संविधान रथयात्रा शुक्रवारी कित्तूर तालुक्यातून खानापूर तालुक्यात आली. खानापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींद्वारे संविधान जागृती रथयात्रेचे स्वागत करण्यात येत आहे. शनिवारी बिडी ग्राम पंचायतीच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत अध्यक्ष संतोष काशीलकर यांनी ज्योत पेटवून स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, माजी सैनिक, साई व्यापारी संघाचे पदाधिकारी, बिडी येथील विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या, विविध खात्यांचे अधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिडी गावच्या वेशीत संविधान रथयात्रेचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. त्यानंतर बिडी बसस्थानकाजवळ संविधान रथयात्रा आल्यानंतर तेथे संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. खानापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत रथयात्रा पोहोचणार असून सोमवार दि. 19 रोजी खानापूर येथील जांबोटी क्रॉसजवळ सभा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. येथे संविधानावर आधारित कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.









