लोकमान्य रंगमंदिर येथे प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती
बेळगाव : अत्यंत भिन्न प्रवृत्तीची, वेगवेगळ्या स्तरातील माणसे एकत्र आणून बाहेरच्या जगाशी त्यांचा पूर्णत: संपर्क सोडून परस्परांशी त्यांचे नातेसंबंध कसे होत जातात, हे अधोरेखित करणारा एक कार्यक्रम अलीकडे लोकप्रिय होऊ लागला आहे. तो म्हणजे ‘बिग बॉस’. या कार्यक्रमात व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येते. नियम आणि अटींचे पालन बंधनकारक ठरते. केवळ बाहेरचे जगच नाही तर फोन, समाजमाध्यमे अगदी कॅलेंडरसुद्धा यापासून त्यांना दूर ठेवले जाते आणि अशा परिस्थितीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा कस लागतो.
याच संकल्पनेवर आधारित प्रसाद खांडेकर लिखित प्रजाकार व सोहम प्रॉडक्शन निर्मित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाचा प्रयोग लोकमान्य सोसायटीतर्फे लोकमान्य रंगमंदिर येथे गुरुवारी प्रेक्षकांच्या लक्षणीय उपस्थितीत पार पडला. आजच्या ताणतणावाच्या जीवनामध्ये नातेसंबंध जपणे किती महत्त्वाचे आहे, याचे प्रत्यंतर या प्रयोगाने दिले. या प्रयोगाला सेंट्राकेअर हॉस्पिटलचे प्रायोजकत्व लाभले.
आपले करिअर घडवू पाहणारा, मॉडेलिंग किंवा झगमगत्या जगात प्रवेश करू पाहणारा तरुण, त्याच्या करिअरच्या आणि जगण्याच्या संकल्पना न पटणारे वडील, गृहिणी या भूमिकेत अतिशय चपखल बसेल अशी आई, तारुण्यसुलभ प्रवृत्तीनुसार मित्रमैत्रिणी आणि खास बेस्टीमध्ये अडकलेली त्या कुटुंबातील लेक यांच्याभोवती या नाटकाची कथा फिरते. वडील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय या गटात मोडणारे. त्यामुळे मुलगा जी स्वप्ने पाहतो ती त्यांच्या आवाक्याबाहेरची आहेत. मुलगी सतत फोनवर असते. पण किरण हे तिच्या मैत्रिणीचेच नाव असू शकते, अशा भ्रमात आई वावरते.
अचानक एक दिवस या
रिअॅलिटी शोसाठी मुलाने केलेल्या नोंदणीनुसार या कुटुंबाची निवड होते आणि बिग बॉसचा सूत्रधार कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे यातील सर्व पात्रांना खेळवत राहतो. हळूहळू प्रत्येकानाच परस्परांच्या खऱ्या स्वभावाची ओळख पटते. स्पर्धेची अपेक्षा म्हणून पात्रांची अदलाबदल होते आणि वडिलांना काय वाटते, हे जेव्हा मुलाला कळते तेव्हा समोर जरी ते आपले कौतुक करत नसतील तरी नकळत ते आपल्याला हवे त्या करिअरसाठी प्रयत्न करून पैसे उभारण्याची तजवीज करतात, हे मुलाला कळते. तसेच मुलगी ज्याच्यासोबत बोलते ती किरण खरे म्हणजे तो किरण आहे, हे आईला समजते. याच पद्धतीने पती पत्नी आणि एकूणच या कुटुंबातील नातेसंबंध हे समोर दिसत नसले तरी आतून हे कुटुंब एकमेकांना घट्ट धरून आहे, हे लक्षात येते.
या नाटकामध्ये लेखक आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर (वडील), नम्रता संभेराव (आई), ओंकार राऊत (मुलगा), भाग्यश्री मिलिंद (मुलगी), प्रथमेश शिवलकर (सूत्रधार) व भक्ती देसाई (या स्पर्धेतील एक स्पर्धक परंतु तिचे स्वत:चे कोणी नाही म्हणून या कुटुंबात सामावलेली) यांच्या भूमिका होत्या. हे नाटक सांघिकतेचा उत्तम नमुना ठरते. पडद्यावर ज्यांना नेहमी आपण पाहतो, त्या कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद प्रेक्षकांनी अनुभवला. यातील वडील आणि मुलगा यांच्या सहज अभिनयाने आणि परफेक्ट टायमिंगने वाहवा मिळविली. तसेच पात्रांची अदलाबदल झाल्यानंतर आई आणि मुलीनेसुद्धा दाद मिळविली. एकूणच या नाटकाने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करून त्यांना रिझवले.स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन लोकमान्यचे असिस्टंट रिजनल मॅनेजर संतोष कृष्णाचे यांनी केले.









