वृत्तसंस्था/ अलूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभागाने विक्रमी 34 व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. शनिवारी येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पश्चिम विभागाने मध्य विभागावर पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली आहे. आता पश्चिम विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात अंतिम सामना पुढील आठवड्यात खेळवला जाईल.
या सामन्यातील शनिवारचा खेळाच्या शेवटच्या दिवशी पावसाचा अडथळा आला आणि मध्य विभागाने दुसऱ्या डावात 35 षटकात 4 बाद 128 धावापर्यंत मजल मारली होती.
या सामन्यात पश्चिम विभागाने पहिल्या डावात 220 धावा जमवल्यानंतर मध्य विभागाचा पहिला डाव 128 धावात आटोपल्याने पश्चिम विभागाने 92 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर पश्चिम विभागाने 3 बाद 149 या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि 92 षटकात त्यांनी दुसऱ्या डावात 9 बाद 292 धावा जमवल्या. चेतेश्वर पुजाराने 278 चेंडूत 1 षटकार आणि 14 चौकारासह 133 धावा झळकवताना सूर्यकुमार यादवसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 95 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने 58 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह 52 धावा जमवल्या. हेट पटेलने 3 चौकारासह 27 धावा केल्या. पश्चिम विभागाने आपल्या दुसऱ्या डावाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा 93.2 षटकात 297 धावावर आटोपला. मध्य विभागाला निर्णायक विजयासाठी 390 धावांचे आव्हान मिळाले. मध्य विभागाने दुसऱ्या डावात दिवसअखेर 4 बाद 128 धावापर्यंत मजल मारल्याने हा सामना अनिर्णित राहिला पण मध्य विभागाने पहिल्या डावात मिळविलेल्या 92 धावांच्या आघडीच्या जोरावर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
संक्षिप्त धावफलक
संक्षिप्त धावफलक : पश्चिम विभाग प. डाव 92.5 षटकात सर्वबाद 220, मध्य विभाग प. डाव 31.3 षटकात सर्वबाद 128, पश्चिम विभाग दु. डाव 93.2 षटकात सर्वबाद 297 (पृथ्वी शॉ 25, पांचाळ 15, पुजारा 133, सूर्यकुमार यादव 52, सर्फराज खान 6, हेट पटेल 27, अतित सेट 9, जडेजा 9, सौरभ कुमार 4-84, सारांश जैन 4-56, यश ठाकुर 1-35), मध्य विभाग दु. डाव 35 षटकात 4 बाद 128 (ज्युरेल 25, अमनदीप खरे नाबाद 27, रिंकू सिंग 40, उपेंद्र यादव नाबाद 18, नागवासवाला, सेट, जडेजा आणि डोडिया प्रत्येकी एक बळी).









