वृत्तसंस्था/ कोहिमा (नागालँड)
तामिळनाडूतील महाबलिपुरम येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान होणाऱया 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची क्रीडाज्योत सोमवारी कोहिमामध्ये दाखल झाली. या स्पर्धेचे भारताला पहिल्यांदाच यजमानपद लाभले आहे.
ऑलिम्पिकच्या धर्तीवर पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा क्रीडाज्योत रॅली आयोजित करण्यात आली आहे. या क्रीडाज्योत रॅलीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योतीचा प्रवासाचा कालावधी 40 दिवसांचा असून यामध्ये 75 शहरांना ही ज्योत भेट देणार आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये या क्रीडाज्योतीचे स्वागत निवडक बुद्धिबळपटू करीत आहेत.
सोमवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योतीचे कोहिमामध्ये आगमन झाल्यानंतर राज्याचे नियोजन सहकार खात्याचे मंत्री नेबा क्रोनू यांनी स्वागत केले. ग्रॅण्डमास्टर अंकित राजपाराने ही क्रीडाज्योत क्रोनू यांच्याकडे सुपूर्द केली. सोमवारी सकाळी ही क्रीडाज्योत मणिपूरमधील इम्फाळमध्ये होती. मणिपूरमध्ये या क्रीडाज्योतीचे स्वागत आमदार एस. प्रेमचंद्र यांनी केले. गेल्या शुक्रवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योत गंगटोक आणि सिलिगुडी या शहरांमध्ये होती. 28 जुलैपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत जगातील 200 देशांचे बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत.









