अंगणवाड्यांच्या आत-बाहेर स्वच्छतेला प्राधान्य द्या : जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : पावसाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अंगणवाड्यांच्या आत-बाहेर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवावे, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. महिला व बालकल्याण खात्याचे सीडीपीओ व अंगणवाडी सुपरवायझर यांच्याबरोबर सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला. अंगणवाडीला येणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. सुपरवायझरनी अंगणवाड्यांना देऊन सीडीपीओंना अहवाल द्यावा, असे सूचित केले.
मुले शाळेत प्रवेश घेतल्याचा अहवाला द्या
सहा वर्षे पूर्ण झालेली मुले शाळेत प्रवेश घेतल्याचा अहवाल द्यावा. गर्भवती व बाळंतिणींच्या घरांना उत्तम आहार पुरवणे व त्याची खात्री करून घेणे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी पालकांची बैठक घेणे सक्तीचे आहे. त्याचे इतिवृत्त छायाचित्रासह पाठवून देणे. अंगणवाडी केंद्रामध्ये शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. ग्राम पंचायतीच्या पातळीवर पाण्याचे परीक्षण करावे. लहान मुलांना गरम करून थंड केलेले पाणी द्यावे. अंगणवाडीचा परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचना केल्या.
लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करा
लहान मुलांमध्ये खोकला, ताप, सर्दी दिसून आल्यास त्वरित त्यांना उपचार द्यावेत. अंगणवाडी केंद्रामधील विजेचे वायरिंग सुस्थितीत आहे याची खात्री करून घ्यावी. प्रधानमंत्री मातृवंदना, भाग्यलक्ष्मी व गृहलक्ष्मीच्या लाभार्थींना विमा उतरविण्याची सूचना केली. यावेळी जिल्हा पंचायतीचे योजना संचालक रवी बंगारेप्पन्नावर, महिला व बालकल्याण खात्याचे आण्णाप्पा हेगडे आदी उपस्थित होते.









