चिपळूण :
अतिवृष्टीत खचलेल्या आणि गेल्या ३ वर्षांपासून सुरू असलेल्या उक्ताड-फरशी मार्गावरील एन्रॉन पुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे. सध्या पुलाच्या खालील बाजूस करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणावर क्युरींग सुरू आहे. त्यानंतर लोड टेस्ट होऊन हा पूल येत्या पंधरा दिवसात वाहतुकीस खुला होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
या पुलाचा एक पिलर २०२१ च्या महापुरात खचल्यानंतर पूल धोकादायक बनला. परिणामी या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. सुरुवातीची दोन वर्षे या पुलाच्या दुरुस्तीकडे शासनाने लक्ष दिले नाही. आमदार शेखर निकम यांनी या पूल दुरुस्ती कामाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार या पुलासाठी निधी मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी निविदा काढल्यानंतर कुणीही कंपनी निविदा भरत नव्हती. परिणामी तिसऱ्या वेळी ‘देवरे अँड सन्स’ या कंपनीवर जबाबदारी सोपवण्यात आली. पहिल्या टप्प्यात खचलेल्या ठिकाणचा स्लॅब उखडून आतील स्टील मोकळे केले. जो पिलर खचला होता, त्या पिलरच्या बाजूने हायड्रोलिक जॅक लावून खचलेला स्लॅब दोन्ही बाजूने वर उचलण्यात आला. त्यामुळे खचलेला पूल समपातळीत आला आहे.
- दुरूस्तीचे काम पूर्ण
सध्या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. केवळ पुलाच्या खालील बाजूस करण्यात आलेल्या काँक्रिटचे २१ दिवसांसाठी क्युरींग सुरू आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या पुलावरुन अवजड वाहतुकीसाठीची लोड टेस्ट केली जाईल. त्यानंतर पूल वाहतुकीस खुला केला जाईल, अशी माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.








