आधारक्रमांक, मोबाईल, मीटर क्रमांकाची गरज
बेळगाव : गृहज्योती योजनेच्या नोंदणीसाठी रविवार दि. 18 पासून प्रारंभ झाला. योजनेबाबत नागरिकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यामुळे नावनोंदणी कुठे करावी, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? याविषयीची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले. याबाबत कर्नाटक राज्य सरकारने एक परिपत्रक जाहीर करून गृहज्योती योजनेमध्ये नावनोंदणी कशी करावी? यासंदर्भात माहिती दिली आहे. सेवासिंधू या पोर्टलवर गृहज्योती योजनेची नोंदणी केली जात आहे. सेवासिंधू पोर्टलवर कन्नड व इंग्रजी या दोन भाषांमध्ये अर्ज भरता येऊ शकतो. मोबाईल, संगणक व लॅपटॉपमधून अर्ज भरण्याची सुविधा आहे. बेंगळूर वन, कर्नाटक वन, बेळगाव वन, ग्रामवन, ग्राम पंचायत, नाड कचेरी किंवा विद्युत कार्यालयामध्ये ग्राहक आपली नावनोंदणी करू शकतात. या योजनेसाठी आधार क्रमांक, मीटरचा आर. आर. क्रमांक व आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 1912 या विद्युत विभागाच्या हेल्पलाईनला संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अर्ज भरताना विद्युत कंपनीचे नाव भरावे लागते. त्यानंतर ग्राहक मालक आहे की भाडेकरू याची माहिती द्यावी लागते. आधार क्रमांक दिल्यानंतर लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक येतो. हा ओटीपी क्रमांक सेवासिंधूवर भरणे आवश्यक आहे. इतर माहिती भरल्यानंतर अर्जाची स्वीकृती होते व तशी पोचपावतीही दिली जाते.









