संरक्षण संबंधांमध्ये विस्तारासाठी सैन्य ‘लॉजिस्टिक सपोर्ट’ करार
वृत्तसंस्था/ हो ची मिन्ह
भारत आणि व्हिएतनामने 2030 पर्यंत संरक्षण संबंधांची कक्षा अधिक व्यापक करण्यासाठी एक ‘व्हिजन’ दस्तऐवज आणि दोन्ही देशांच्या सैन्यांना परस्परांच्या सुविधांचा वापर करू देण्याची अनुमती देण्याकरता ‘लॉजिस्टिक सपोर्ट’ करारावर स्वाक्षरी केली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल फान वान गियांग यांची भेट घेत द्विपक्षीय संरक्षण तसेच सुरक्षा सहकार्य वाढविण्यावर सहमती झाल्यावर या करारांवर स्वाक्षरी केली आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या अरेरावीदरम्यान दोन्ही देशांमधील सामरिक संबंधातील या प्रगतीला महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
व्हिएतनामने अशाप्रकारचा मोठा करार पहिल्यांदाच अन्य देशासोबत केला आहे. या करारामुळे दोन्ही देशांचे सैन्य परस्परांच्या संस्थांचा वापर दुरुस्ती कर्या तसेच पुरवठासंबंधी कार्यासाठी करू शकणार आहे. दोन्ही देशांच्या संरक्षण दलांदरम्यान सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीकोनातून हा परस्पर लाभदायक लॉजिस्टिक सपोर्ट प्रक्रियांना सुलक्ष करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
राजनाथ सिंह तीन दिवसीय दौऱयानिमित्त मंगळवारी व्हिएतनाममध्ये पोहोचले. व्हिएतनामचे संरक्षणमंत्री जनरल फान वान गियांग यांच्यासोबतची भेट फलदायी ठरली. आम्ही द्विपीय सहकार्याच्या विस्तारावर चर्चा केली आहे. दोन्ही देशांमधील घनिष्ठ संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे राजनाथ यांनी ट्विट करत म्हटले आहे.

2030 पर्यंत विविध क्षेत्रांमध्ये संरक्षण संबंधांच्या महत्त्वपूर्ण विस्तारासाठी संयुक्त दृष्टीकोन दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. सखोल विचारविनिमयानंतर ‘जॉइंट व्हिजन स्टेटमेंट ऑन इंडिया-व्हिएतनाम डिफेन्स पार्टनरशिप टुवर्ड्स 2030’वर स्वाक्षरी केली असून याच्या माध्यमातून संरक्षण सहकार्याची कक्षा वाढविण्यात येणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
संरक्षणमंत्री हे व्हिएतनामचे राष्ट्रपती गुयेन जुआन फुक आणि पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांनाही भेटणार आहेत. व्हिएतनामला संरक्षण क्षेत्रासाठी 50 कोटी डॉलर्सची कर्जसुविधा (एलओसी) देण्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सिंह यांनी चर्चेदरम्यान सांगितले आहे. संरक्षणमंत्र्यांनी व्हिएतनामचे संस्थापक हो ची मिन्ह यांच्या समाधीवर श्रद्धांजली वाहून स्वतःच्या दौऱयाला सुरुवात केली होती. बौद्ध मंदिर ‘ट्रैन क्वोक पगोडा’लाही त्यांनी भेट दिली होती.
व्हिएतनाम हा आसियानमधील एक महत्त्वपूर्ण देश आहे. व्हिएतनामचा दक्षिण चीन समुद्र क्षेत्रात चीनसोबत वाद सुरू आहे. दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनामच्या जलक्षेत्रात कच्च्या तेलाचे उत्खनन करण्यासाठी भारताकडून प्रकल्प राबविण्यात येत आहेत. भारत आणि व्हिएतनाम हे दोन्ही देश संयुक्त हितसंबंधांच्या रक्षणासाठी मागील काही वर्षांमध्ये स्वतःचे सागरी सुरक्षा सहकार्य वाढविण्यासाठी मिळून काम करत आहेत.
भारताचे ‘ऍक्ट ईस्ट धोरण’ तसेच ‘हिंद-प्रशांत व्हिजन’मध्ये व्हिएतनाम एक महत्त्वाचा भागीदार ठरला आहे. दोन्ही देश 2 हजार वर्षांपेक्षा जुन्या सांस्कृतिक संबंधांचा एक समृद्ध इतिहास बाळगत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. जुलै 2007 मध्ये व्हिएतनामचे तत्कालीन पंतप्रधान गुयेन तान डुंग यांच्या भारत दौऱयादरम्यान दोन्ही देशांमधील संबंधांना ‘धोरणात्मक भागीदारी’चा दर्जा देण्यात आला होता. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिएतनाम दौऱयादरम्यान हा दर्जा वाढवून ‘व्यापक धोरणात्मक भागीदारी’ करण्यात आला होता.









