वृत्तसंस्था /चेस्टर लि स्ट्रीट
यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू झालेल्या चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात हॅरी ब्रुक आणि डेव्हिड मलान यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडचा 7 गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली. इंग्लंडच्या ब्रायडन कार्से याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. या सामन्यात कार्सेने 23 धावात 3 गडी बाद केले. या मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टर येथे शुक्रवारी खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकात 9 बाद 139 धावा जमवत इंग्लंडला विजयासाठी 140 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर इंग्लंडने केवळ 14 षटकात 3 बाद 143 धावा जमवत विजयाचे उद्दिष्ट गाठले. न्यूझीलंडच्या संघामध्ये फिलिप्सने 38 चेंडूत 4 चौकारासह 41, अॅलेनने 15 चेंडूत 3 षटकारासह 21, चॅपमनने 9 चेंडूत 1 षटकारासह 11, मिलेनीने 9 चेंडूत 1 षटकारासह 10, सोधीने 12 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा जमवल्या. न्यूझीलंडने पॉवर प्ले दरम्यानच्या पहिल्या सहा षटकात 38 धावा जमवताना 3 गडी गमवले. न्यूझीलंडचे अर्धशतक 48 चेंडूत तर शतक 98 चेंडूत फलकावर लागले. न्यूझीलंडच्या डावामध्ये 6 षटकार आणि 9 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे वूड आणि कार्से हे प्रभावी गोलंदाज ठरले. वूडने 37 धावात 3 तर कार्सेने 23 धावात 3 तसेच आदिल रशीद, मोईन अली आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. न्यूझीलंडच्या साऊदीने आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीच्या बेअरस्टोला 4 धावावर झेलबाद केले. त्यानंतर डेव्हिड मलान आणि जॅक्स यांनी दुसऱ्या गड्यासाठी 6.1 षटकात 47 धावांची भागीदारी केली. सोधीने जॅक्सला अॅलेनकरवी झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 22 धावा जमवल्या. जॅक्स बाद झाल्यानंतर मलान आणि ब्रुक यांनी आपल्या संघाला विजयाच्या समीप नेले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. डावातील 13 व्या षटकात डेव्हिड मलान झेलबाद झाला. फर्ग्युसनने त्याला मिचेलकडे झेल देण्यास भाग पाडले. मलानने 42 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 54 धावा जमवल्या. मलानने आपले अर्धशतक 40 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकवले. मलान बाद झाल्यानंतर ब्रुक आणि लिव्हिंगस्टोन यांनी 14 व्या षटकातच विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. ब्रुक 27 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 43 तर लिव्हिंगस्टोनने 4 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 10 धावा केल्या. इंग्लंडला अवांतराच्या रुपात 10 धावा मिळाल्या. इंग्लंडच्या डावात 7 षटकार आणि 10 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडने पॉवर प्ले दरम्यानच्या पहिल्या सहा षटकात 61 धावा जमवताना एक गडी गमवला. इंग्लंडचे पहिले अर्धशतक 31 चेंडूत तर शतक 66 चेंडूत फलकावर लागले. मलान आणि ब्रुक यांनी तिसऱ्या गड्यासाठीची अर्धशतकी भागीदारी 29 चेंडूत नोंदवली. त्याचप्रमाणे जॅक्स आणि मलान यांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 33 चेंडूत नोंदवली. न्यूझीलंडतर्फे साऊदी, फर्ग्युसन आणि सोधी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 20 षटकात 9 बाद 139 (अॅलेन 3 षटकारासह 21, फिलिप्स 4 चौकारांसह 41, चॅपमन 1 षटकारासह 11, मिल्ने 1 षटकारासह 10, सोधी 1 षटकार आणि 1 चौकारांसह 16, अवांतर 4, वूड 3-37, कार्से 3-23, आदिल रशीद, मोईन अली, लिव्हिंगस्टोन प्रत्येकी एक बळी), इंग्लंड 14 षटकात 3 बाद 143 (बेअरस्टो ड4, जॅक्स 1 षटकार आणि 2 चौकारांसह 12 चेंडूत 22, मलान 42 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 54, ब्रुक 27 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 43, लिव्हिंगस्टोन 4 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 10, अवांतर 10, साऊदी 1-25, फर्ग्युसन 1-34, सोधी 1-23),









