दुसऱ्या टी 20 सामन्यात आफ्रिकेवर 146 धावांनी विजय ; टीम इंडियाचे मोडले रेकॉर्ड
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
मँचेस्टरमध्ये खेळवण्यात आलेल्या द. आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडने अनेक ऐतिहासिक विक्रम मोडले. इंग्लंडचा संघ टी-20 मध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील तिसरा तर आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेला पहिला संघ ठरला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात इंग्लंडने 20 षटकांत दोन विकेट्स गमावत 304 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकन संघ 158 धावांत ऑलआऊट झाला. 60 चेंडूत 141 धावांची आतषबाजी करणाऱ्या फिल सॉल्टला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवल्यानंतर आफ्रिकेचा संघ दुसरा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला होता. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी त्यांची ही अपेक्षा काही मिनिटांतच धुळीस मिळवली. फिल सॉल्ट आणि जोस बटलर यांच्या फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकांत 2 बाद 304 धावांचा डोंगर उभारला. सॉल्ट आणि बटलर जोडीने 7.5 षटकांत 126 धावांची भागीदारी केली. बटलरने तुफानी फलंदाजी करताना 30 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारासह 83 धावांची खेळी साकारली. बटलर बाद झाल्यानंतर फिल सॉल्टने विक्रमी शतक झळकावले. वादळी खेळीचा नजराणा पेश करताना त्याने 39 चेंडूत शतक साजरे केले. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात इंग्लंडकडून सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झाला आहे. सॉल्टने 60 चेंडूत 15 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी करताना 141 धाव फटकावल्या. त्याला जेकब बेथेल (26) आणि हॅरी ब्रूक (नाबाद 41) यांनी चांगली साथ दिली.
आफ्रिकेचा दारुण पराभव
प्रत्युत्तरात आफ्रिकेचा डाव 16.1 षटकांत 158 धावांवर आटोपला. इंग्लंडच्या 304 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. कर्णधार एडन मार्करम आणि यष्टीरक्षक-फलंदाज रायन रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी 22 चेंडूंमध्ये 50 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर आफ्रिकेचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मार्करमने 20 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 2 चौकारांसह 41 धावा केल्या. तर रिकल्टनने 10 चेंडूंमध्ये20 धावांची खेळी केली. याशिवाय ब्योर्न फोर्टुइनने 16 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांसह 32 धावा केल्या. तसेच ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हॉन फरेरा यांनी प्रत्येकी 23 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्यामुळे आफ्रिकेला तब्बल 146 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 3 बळी घेतले, तर सॅम करन, लियाम डॉसन आणि विल जॅक्स यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
दरम्यान, इंग्लंडने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता, उभय संघातील तिसरा व शेवटचा टी 20 सामना दि. 14 रोजी
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 20 षटकांत 2 बाद 304 (फिल सॉल्ट नाबाद 141, बटलर 83, बेथेल 26, ब्रूक नाबाद 41, फोर्च्युन 2 बळी)
द. आफ्रिका 16.1 षटकांत सर्वबाद 158 (मारक्रम 41, फोर्च्युन 32, स्टब्ज आणि फरेरा 23 धावा, आर्चर 3 बळी, सॅम करन, डॉसन आणि विल जॅक्स प्रत्येकी 2 बळी).
टी 20 क्रिकेटमध्ये इंग्लंडची सर्वोच्च धावसंख्या
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने 20 षटकात 2 बाद 304 धावा लावल्या. आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये उभारलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी हा विक्रम टीम इंडियाच्या नावे होता. भारतीय संघाने 2024 मध्ये हैदराबादच्या मैदानात बांगलादेशविरुद्ध 6 बाद 297 धावा केल्या होत्या. हा विक्रम इंग्लंडच्या संघाने मोडीत काढला आहे.
आयसीसीच्या पूर्ण वेळ सदस्य संघाविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या
- 304/2 इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका, मँचेस्टर, 2025
- 297/6 भारत वि बांगलादेश, हैदराबाद, 2024
- 283/1 भारत वि दक्षिण आफ्रिका, जोहॅन्सबर्ग, 2024
- 278/3 अफगाणिस्तान वि आयर्लंड, देहरादून, 2019
आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा झिम्बाब्वेच्या नावे आहे. 2024 मध्येत्यांनी गॅम्बिया विरुद्ध 344 धावा कुटल्या होत्या. त्यापाठोपाठ या यादीत नेपाळचा नंबर लागतो. 2023 मध्ये मंगोलियाविरुद्ध त्यांनी 314 धावा केल्या होत्या. या दोन संघापाठोपाठ इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे.









