आयपीएल लिलावात पंजाबकडून मिळाली विक्रमी 18.5 कोटी रक्कम, ग्रीनसाठी मुंबईने दिले 17.5 कोटी
वृत्तसंस्था/ कोची
येथे घेण्यात आलेल्या आयपीएल लिलावात इंग्लंडचा 24 वर्षीय अष्टपैलू सॅम करन आजवरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्याला पंजाब किंग्सने तब्बल 18.5 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता आणि त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळविला होता.

2021 आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्यावेळी राजस्थान रॉयल्सने त्याला 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते. पण सॅम करनने 18.50 कोटीचा नवा विक्रम नोंदवत त्याला मागे टाकले आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील लिलावात 87 पैकी 37 खेळाडूंचा लिलाव झाला. करनसाठी सर्वच प्रँजायजींमध्ये आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ लागली होती. त्यात मुंबई इंडियन्स, आरसीबी, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान, चेन्नई सुपरकिंग्स व पंजाब किंग्स यांचा समावेश होता. पंजाबने त्याला घेण्याचा चंगच बांधला होता, असेच त्यांच्या बोलीवरून वाटत होते आणि अखेर त्यांनीच बाजी मारली. करन यापूर्वी 2019 मध्ये पंजाब संघाकडून खेळला होता. त्या दृष्टीने विचार केल्यास त्याचे घरच्या संघात पुनरागमन झालेय, असे म्हणावे लागेल.

करन, कॅमेरॉन ग्रीन व बेन स्टोक्स यांना मोठी बोली लागणार, असा अंदाज आधीच व्यक्त करण्यात आला होता आणि तो खराही ठरला. ऑस्ट्रेलियाचा 23 वर्षीय अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनला आयपीएलमधील पहिला संघ मिळाला असून त्याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले आहे. त्याच्यासाठी मुंबई व दिल्ली यांच्यात जोरदार चुरस लागली होती. मुंबईने त्याला 17.50 कोटी रुपयांना खरेदी केले. तो दुसऱया क्रमांकाचा आजवरचा सर्वात महागडा खेळाडू बनला. इंग्लंडचा आणखी एक अष्टपैलू बेन स्टोक्सला चेन्नई सुपरकिंग्सने केकेआरवर मात करीत 16.25 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले.
लखनौ सुपर जायंट्ने विंडीजच्या धडाकेबाज निकोलस पूरनसाठी मोठी रक्कम लावली. 16 कोटी रुपयांना त्यांनी पूरनला आपल्या संघात सामील करून घेतले. त्याच्यासाठीही मोठी चुरस लागली होती. 2018 पासून कोलकाता संघात असणारा शिवम मावी भारताचा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. त्याला गुजरातने 6 कोटी रुपयांना (40 लाख प्राथमिक किंमत) खरेदी केले. दिल्लीने बिहारचा सीमर मुकेश कुमारला 5.5 कोटींना खरेदी केली. तो दुसऱया क्रमांकाचा भारताचा महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. जम्मू-काश्मिरचा विव्रांत शर्माला सनरायजर्स हैदराबादने 2.6 कोटी रुपयांना घेतले. या 23 वर्षीय खेळाडूची बेस प्राईस 20 लाख रुपये होती.

इंग्लंडच्या 23 वर्षीय हॅरी ब्रुकला सनरायजर्स हैदराबादने 13.25 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची बेस प्राईस 1.5 कोटी ठेवण्यात आली होती. त्याच्यासाठी बेंगळूर, राजस्थान व हैदराबाद या तीन संघांत चुरस लागली होती. हैदराबादने त्याला त्याच्या बेस प्राईसच्या आठ पट रक्कम देऊन खरेदी केले. या लिलावासाठी हैदराबाद संघाकडे सर्वात मोठी रक्कम उपलब्ध होती.
गेल्या वर्षी पंजाब संघाचे नेतृत्व केलेल्या मयांक अगरवालला यावेळी सनरायजर्स हैदराबादने घेताना 8.25 कोटी किंमत दिली. 1 कोटी ही त्याची बेस प्राईस होती. या लिलावात सर्वप्रथम बोली लागली ती हैदराबादचा माजी कर्णधार केन विल्यम्सनला. त्याला विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने 2 कोटी रुपयांना खरेदी केले. हीच त्याची बेस प्राईसही होती. भारताच्या अजिंक्य रहाणेला त्याची बेस प्राईस 50 लाखाला चेन्नई सुपरकिंग्सने आपल्या संघात घेतले तर इंग्लंडचा जो रूट पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला.
दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज हेन्रिच क्लासेनलाही बऱयापैकी किमत मिळाली. हैदराबादने त्याला 5.25 कोटी रुपयांना घेतले. मागील वर्षी लखनौचे प्रतिनिधित्व केलेल्या विंडीजच्या जेसन होल्डरला यावेळी राजस्थानने 5.75 कोटींना खरेदी केले तर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा व विंडीजचा ओडियन स्मिथ यांना त्यांची बेस प्राईस 50 लाखाला अनुक्रमे पंजाब व गुजरात संघांनी खरेदी केले. याशिवाय भारताचे गोलंदाज जयदेव उनादकट व इशांत शर्मा यांनाही त्यांची बेस प्राईस 50 लाखाला लखनौ व दिल्ली संघांनी घेतले. या टप्प्यात द.आफ्रिकेचा रिली रॉसो व बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन अनसोल्ड राहिले.









