वृत्तसंस्था/ सिडनी
2023 सालाती फिफाच्या सुरू असलेल्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने डेन्मार्कचा 1-0 असा गोलफरकाने निसटता पराभव केला.
इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यातील एकमेव गोल इंग्लंडच्या लॉरेन जेम्सने सहाव्या मिनिटाला नोंदवला. मध्यंतरापर्यंत इंग्लंडने डेन्मार्कवर 1-0 अशी आघाडी मिळवली होती. सामना संपण्यास केवळ पाच मिनिटे बाकी असताना डेन्मार्क संघातील बदली खेळाडू अॅमेली व्हेन्सगार्डने इंग्लंडच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण तिचा फटका गोलपोस्टच्या दांडीला आदळून बाहेर गेल्याने डेन्मार्कने सामना बरोबरीत राखण्याची संधी गमवली. युरोपियन चॅम्पियन इंग्लंड महिला फुटबॉल संघाला या सामन्यात डेन्मार्कच्या फुटबॉलपटूंनी शेवटपर्यंत चांगलेच दमवले होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील इंग्लंडचा हा सलग दुसरा विजय आहे. या स्पर्धेतील ड गटातील झालेल्या पहिल्या सामन्यात डेन्मार्कने चीनचा पराभव केला होता. सामन्याच्या उत्तरार्धातील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत इंग्लंडच्या खेळाडूंनी आघाडी वाढविण्याची संधी गमवली. या विजयामुळे इंग्लंडने ड गटात आघाडीचे स्थान मिळवले आहे. आता इंग्लंडचा ड गटातील शेवटचा सामना चीनबरोबर अॅडलेड येथे येत्या मंगळवारी होणार आहे तर डेन्मार्कचा सामना हेतीबरोबर पर्थ येथे खेळविला जाईल.









