वृत्तसंस्था/ मँचेस्टर
ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध दुसऱया कसोटीत यजमान इंग्लंडने आपली स्थिती अधिक भक्कम केली. या सामन्यात शुक्रवारी बेन स्टोक्स आणि फोक्स यांनी शानदार शतके झळकविल्याने इंग्लंडने आपला पहिला डाव 9 बाद 415 धावांवर घोषित करून दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या डावात 264 धावांची आघाडी मिळविली. शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवशी शेवटची बातमी हाती आली त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने दुसऱया डावात 3 बाद 106 धावा जमविल्या होत्या. द. आफ्रिकेचा संघ अद्याप 158 धावांनी पिछाडीवर होता.
या कसोटीत द. आफ्रिकेचा पहिला डाव केवळ 151 धावात आटोपला. त्यानंतर इंग्लंडच्या पहिल्या डावालाही डळमळीत सुरुवात झाली होती. इंग्लंडचा निम्मा संघ 147 धावात तंबूत परतला होता. पण, त्यानंतर बेन स्टोक्स आणि फोक्स यांनी आपली वैयक्तिक शतके झळकविताना सहाव्या गडय़ासाठी 173 धावांची भागीदारी केली. इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर स्टोक्सचे हे पहिलेच शतक आहे. फोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये आपली सर्वोच्च नाबाद 113 धावसंख्या नोंदविली. स्टोक्सचे कसोटीतील हे बारावे शतक असून फोक्सचे दुसरे शतक आहे. फोक्सने 2018 साली लंकेविरुद्ध आपले कसोटी पदार्पण करताना पहिले शतक झळकविले होते.
कर्णधार स्टोक्सने 163 चेंडूत 3 षटकार, 6 चौकारांसह 103 तर फोक्सने 217 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 113 धावा झळकविल्या. ब्रॉडने 1 षटकार, 2 चौकारांसह 21, रॉबिनसनने 2 चौकारांसह 17 तर लिचने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. द. आफ्रिकेतर्फे नॉर्जेने 3 तर रबाडा, केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 तसेच एन्गिडी आणि हार्मेर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
द. आफ्रिकेने बिनबाद 23 या धावसंख्येवरून शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवसाला पुढे प्रारंभ केला आणि शेवटची बातमी हाती आली त्यावेळी त्यांनी 45.3 षटकात 3 बाद 106 धावा जमविल्या. इंग्लंडच्या अँडरसनने कर्णधार एल्गारचा त्रिफळा उडविला. त्याने 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. त्यानंतर रॉबिन्सनने इर्वीला झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 25 धावा केल्या. ब्रॉडने मार्करेमचा बळी मिळविला. त्याने 1 चौकारासह 6 धावा जमविल्या. किगेन पीटरसन 1 चौकारासह 31 तर व्हान डेर डय़ुसेन 3 चौकारांसह 21 धावांवर खेळत होते.
इंग्लंडतर्फे अँडरसन, रॉबिन्सन आणि ब्रॉड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला आहे. या मालिकेत द. आफ्रिकेने पहिली कसोटी केवळ तीन दिवसात जिंकून आघाडी मिळविली होती.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका प. डाव 45.1 षटकात सर्वबाद 151, इंग्लंड प. डाव 106.4 षटकात 9 बाद 415 (डाव घोषित), (स्टोक्स 103, फोक्स नाबाद 113, क्रॉले 38, पॉप 23, ब्रॉड 21, रॉबिन्सन 17, लिच 11, रबाडा 2-130, नॉर्जे 3-82, केशव महाराज 2-78, एन्गीडी 1-61, हार्मेर 1-73), द. आफ्रिका दु. डाव 45.3 षटकात 3 बाद 106 (इर्वी 25, एल्गार 11, पीटरसन खेळत आहे 31, मार्करेम 6, व्हान डेर डय़ुसेन खेळत आहे 21, अँडरसन, रॉबिन्सन, ब्रॉड प्रत्येकी 1 बळी).









