फिल सॉल्ट ‘मालिकावीर’, आदिल रशीद ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / डब्लीन
इंग्लंड क्रिकेट संघाने यजमान आयर्लंड विरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-0 अशी फरकाने जिंकली. इंग्लंडच्या फिल सॉल्टला ‘मालिकावीर’ तर आदिल रशीदला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडचा 6 गड्यांनी पराभव केला. या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी दिली. आयर्लंडने 20 षटकात 8 बाद 154 धावा जमविल्यानंतर इंग्लंडने 17.1 षटकात 4 बाद 155 धावा जमवित विजय नोंदविला. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 4 गड्यांनी जिंकला होता तर दुसरा सामना पावसामुळे वाया गेला.
या शेवटच्या सामन्यात आयर्लंडच्या डावात रॉस अॅडरने 23 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 33, डिलेनीने 29 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 48, टेक्टरने 27 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 28, बेन कॅलीझने 18 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 22 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 6 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 46 धावा जमविताना 1 गडी गमविला. आयर्लंडचे अर्धशतक 37 चेंडूत, शतक 86 चेंडूत तर दीड शतक 119 चेंडूत नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे अदिल रशीदने 29 धावांत 3 तर डॉसन आणि ओव्हरटन यांनी प्रत्येकी 2 तसेच रेहान अहमदने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये जॉर्डन कॉक्सने 35 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 55 धावा जमविल्या. बेनटनने 26 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 37 धावा झळकविल्या. कॉक्स आणि बेनटन यांनी चौथ्या गड्यासाठी 49 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी सलामीच्या सॉल्टने 23 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 29, कर्णधार बेथेलने 11 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावा जमविल्या. रेहान अहमदने 1 चौकारासह नाबाद 9 धावा केल्या. इंग्लंडच्या डावात 5 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 57 धावा जमविताना 2 गडी गमविले. इंग्लंडचे अर्धशतक 33 चेंडूत, शतक 65 चेंडूत आणि दीड शतक 102 चेडूत नोंदविले गेले. कॉक्सने 31 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले. आयर्लंडतर्फे मॅक्रेथी, यंग, कॅम्फर आणि व्हाईट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: आयर्लंड 20 षटकात 8 बाद 154 (डिलेनी नाबाद 48, अॅडेर 33, टेक्टर 28, कॅलीझ 22, डॉसन, ओव्हरटन प्रत्येकी 2 बळी, अदिल रशीद 3-29, रेहान अहमद 1-24), इंग्लंड 17.1 षटकात 4 बाद 155 (कॉक्स 55, बेनटन नाबाद 37, रेहान अहमद नाबाद 9, बेथेल 15, सॉल्ट 29, बटलर 0, अवांतर 10, मॅक्रेथी, यंग, कॅम्फर, व्हाईट प्रत्येकी 1 बळी).









