चौथ्या सामन्यातही न्यूझीलंडचा 100 धावांनी पराभव : मालिका 3-1 फरकाने इंग्लंडकडे : डेव्हिड मालन सामनावीर व मालिकावीरचा मानकरी
वृत्तसंस्था /लंडन
यजमान इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेली चार सामन्यांची वनडे मालिका इंग्लंडने 3-1 फरकाने जिंकली. शुक्रवारी झालेल्या चौथ्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 100 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकांत 9 बाद 311 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 38.2 षटकांत 211 धावांवर आटोपला. या सामन्यात शानदार शतकी खेळी साकारणाऱ्या डेव्हिड मालनला सामनावीर तसेच मालिकेत 277 धावांची बरसात करणाऱ्या मालनलाच मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
प्रारंभी, इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार जोस बटलरचा हा निर्णय सार्थ ठरवताना इंग्लंडने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 311 धावा केल्या. सलामीवीर डेव्हिड मालनने शानदार शतकी खेळी साकारताना 114 चेंडूत 14 चौकार व 3 षटकारासह 127 धावा फटकावल्या. कर्णधार बटलरने 36 तर लिव्हिंगस्टोनने 28 धावा करत त्याला चांगली साथ दिली. रुटने 29 तर सॅम करनने 20 धावा केल्या. इतर इंग्लिश फलंदाजांना मात्र मोठी खेळी साकारता आली नाही. न्यूझीलंडकडून रचिन रविंद्रने सर्वाधिक 4 बळी घेतले. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 38.2 षटकांत 211 धावांवर गडगडला. गोलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर युवा रचिन रविंद्रने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 48 चेंडूत सर्वाधिक 61 धावा केल्या. हेन्री निकोल्सने 41, ग्लेन फिलिप्सने 25 तर सलामीवीर विल यंगने 24 धावा केल्या. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्याने न्यूझीलंडला 100 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 4 बळी मिळवले. आता, न्यूझीलंड संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ते तीन सामन्यांची वनडे मालिका खेळतील. मालिकेतील पहिला सामना दि. 21 रोजी होईल.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 50 षटकांत 9 बाद 311 (मालन 127, जो रुट 29, बटलर 36, लिव्हिंगस्टोन 28, रचिन रविंद्र 60 धावांत 4 बळी, मॅट हेन्री 69 धावांत 2 बळी).
न्यूझीलंड 38.2 षटकांत सर्वबाद 211 (हेन्री निकोल्स 41, फिलिप्स 25, रचिन रविंद्र 61, मोईन अली 50 धावांत 4 बळी, डेव्हिड विली, सॅम करन, लिव्हिंगस्टोन प्रत्येकी एक बळी).









