लंडन / वृत्तसंस्था
इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो दुखापतीमुळे टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर फेकला गेला आहे. बेअरस्टोचा यापूर्वी जाहीर इंग्लिश संघात समावेश होता. मात्र, लीड्समध्ये शुक्रवारी गोल्फ खेळत असताना दुखापत झाल्याने त्याला आगामी स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. गोल्फ कोर्सवर घसरुन पडल्यानंतर त्याला दुखापत झाली. बेअरस्टोने इन्स्टाग्रामवर या दुखापतीची माहिती दिली. तसेच शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केले. इंग्लिश निवड समितीने या स्पर्धेसाठी जेसॉन रॉयला वगळत आश्चर्याचा धक्का दिला होता.









