वृत्तसंस्था/ बेंगळूर
इंग्लंडचा अष्टपैलू डेव्हिड विलीने भारतात सुरू असलेली विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाची अतिशय खराब कामगिरी झाली असली तरी त्याचा या निर्णयाशी कोणताही संबंध नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
गेल्या आठवड्यात इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने 2023-24 मोसमासाठी खेळाडूंच्या मध्यवर्ती करारासाठी निवडलेल्या यादीत विलीला वगळले होते. ‘हा दिवस यावा, असे मला वाटत नव्हते. तरुण वयात मी इंग्लंडसाठी क्रेकेट खेळण्याचे स्वप्न बाळगले होते. तेव्हा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याची वेळ आलीय, असे वाटल्याने मी हा निर्णय घेतलाय,’ असे विलीने पोस्टमध्ये म्हटले आहे. 2015 मध्ये विलीने आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि आजवर त्याने 70 वनडेत 94 बळी व 43 टी-20 मध्ये 51 बळी मिळविले आहेत. त्याने दोन अर्धशतकांसह वनडे 627 धावा 26.12 सरासरीने जमविल्या.









