चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू झाल्यानंतर मला अ गटापेक्षा ब गट आकर्षणाचा केंद्रबिंदू वाटतो. तीन तगडे संघ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि एक डार्क हॉर्स अर्थातच अफगाणिस्तान. काल खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक स्वरूपात झटपटअअ क्रिकेटमधील अॅशेस बघायला मिळालं. हिंदी चित्रपटात मराठी नायिकांचा ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी माधुरी दीक्षित श्रेष्ठ की स्मिता पाटील? अर्थात याचे उत्तर अजूनही मला मिळालं नाहीये. तीच गोष्ट इंग्लंड व ऑस्ट्रेलियाची. तळीरामांना पेग रिचवताना जेवढा आनंद किंवा सुख मिळतं किंबहुना त्याच्यापेक्षा काकणभर जास्त आनंद किंवा सुख इंग्लंड विऊद्ध ऑस्ट्रेलिया सामना बघताना मिळतो. एक वेगळीच खुन्नस, एक वेगळीच नशा त्या सामन्यात असते. या लेखमालेच्या अनुषंगाने मी ऑस्ट्रेलियाबद्दल म्हटलं होतं की ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेत सामने स्वाहा करण्यासाठी आलाय. कालचा परफॉर्मन्स बघून ते शब्द मला निश्चितच मागे घ्यावे लागतील. चार ते पाच मोठे खेळाडू या स्पर्धेत नाहीत. तरीसुद्धा दडपणाखाली सर्वोत्तम खेळ कसा करायचा हे कांगारूच्या खेळाडूंनी काल दाखवून दिले.
जोस हेझलवूड, पॅट कमिन्स, मिच मार्श ही सर्व ब्रँडेड मंडळी नसताना ‘हम है तो क्या डर है’ हे अगदी ठणकावून सांगितले. त्यांना या सामन्यात चित्रकला किंवा कार्यानुभवसारखा पेपर सोडवायचा नव्हता. इथे पेपर भूमितीचा होता आणि भूमिती म्हटलं की प्रमेयं आलीच. आणि हीच प्रमेयं त्यांनी व्यवस्थित सोडवत पैकीच्या पैकी मार्क मिळवले. पाठलाग काही 220 किंवा 240 चा नव्हता. त्यातच परिस्थिती दोन बाद 31 असेल आणि त्यातच वेगवान मारा आर्चर आणि वूडचा आणि 140 किंवा 145 स्पीडच्या वर असेल तर काय भंबेरी उडू शकते याची कल्पना न केलेलीच बरी. ट्रेवीस हेड व कर्णधार स्मिथ ‘नाम बडे दर्शन खोटे’ म्हणत झटपट तंबूत परतल्यानंतर जोस इंग्लिस (इंग्लिश) ज्या पद्धतीने खेळपट्टीवर बहरला ते पाहून खरोखर डोळ्यांचे पारणे फिटले. काय योगायोग बघा, नाव इंग्लिश, जन्म इंग्लंडचा आणि पराभव केला तोही इंग्लंडचाच. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिग स्पर्धेत बहारदार खेळ केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात पदार्पण करणारा हा खेळाडू. बघता बघता ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील स्टार यार कलाकारांच्या यादीत जाऊन बसलाय. या अगोदरचे तीन दिग्गज म्हणजे वॉर्नर, वॉटसन, मॅक्सवेल. जोस इंग्लिशच्या खेळीसमोर इंग्लंडच्या बेन डकेटची 165 धावांची खेळी छोटी ठरली. क्रिकेटमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट कसे खेळावे याचा जणू पायंडा त्यांनी काल घालून दिला. जाता जाता मॅक्सवेलने नेट प्रॅक्टिसमध्ये फलंदाजी करावी अगदी तशी फलंदाजी करत आपल्या संघाच्या विजयाला एक वेगळीच किनार दिली.
या विजयाने मात्र क्रिकेटने एक सिद्ध केलं की तुमच्याकडे प्रतिभा असेल तर अल्लाउद्दीनचा चिराग घासायची गरज नाही. क्रिकेटच्या दुनियेत एक काळ असा होता की वेस्टइंडीज संघ बेदरकारपणे खेळ करत प्रतिस्पर्धी संघाच्या चिंधड्या उडवायचा. मागील काही वर्षापासून ती किमया ऑस्ट्रेलिया संघ करतोय एवढं मात्र खरं!
या स्पर्धेला प्रेक्षकांची गर्दी होणार की नाही? हा प्रश्न मला पडला होता. सलामीचा पाकिस्तान2-न्यूझीलंड त्यानंतर अफगाणिस्तान2-आफ्रिका आणि काल परवा दुबईत भारत-बांगलादेश सामन्यात प्रेक्षकांची उपस्थिती झटपट क्रिकेटसाठी आत्मचिंतन करण्यासारखी होती. परंतु दोन दिवसातच प्रेक्षकांनी कात टाकली. असो. एकंदरीत ऑस्ट्रेलियन संघाचे कौतुक करावं लागेल. त्यांचे वरचे खेळाडू कधी खालच्या खेळाडूंना सांभाळतात तर कधी खालचे वरच्यांना सांभाळतात. जणू काही मेड फॉर इचआदरच. ऑस्ट्रेलियन संघाने एक मात्र सिद्ध केलं, खेळ असो किंवा युद्ध तुमच्याकडे नेहमीच एके 47 असणे गरजेचे नाही. कधी कधी छोटा मोठा दारूगोळा तुम्हाला तुमची नय्या पार करून देऊ शकतो, एवढं मात्र निश्चित!









