पहिली कसोटी, वैभव सूर्यवंशी, अंबरीश यांची अर्धशतके आर्ची वॉन : 84 धावांत 6 बळी
वृत्तसंस्था / बेकेनहॅम
येथे सुरू असलेल्या भारत आणि यजमान इंग्लंड 19 वर्षांखालील वयोगटाच्या युवा संघातील पहिल्या कसोटीत मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवशी भारतीय युवा संघाने इंग्लंडला विजयासाठी 349 धावांचे आव्हान दिले आहे. भारतीय युवा संघाच्या दुसऱ्या डावात सलामीचा वैभव सूर्यवंशी, मल्होत्रा आणि अंबरीश यांनी अर्धशतके झळकविली.
उभय संघातील ही कसोटी चार दिवसांची खेळविली जात आहे. भारतीय युवा संघाने पहिल्या डावात 540 धावा जमविल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 439 धावा केल्या. भारताने 101 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने तीन बाद 128 या धावसंख्येवरुन शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि भारताचा दुसरा डाव 57.4 षटकात 248 धावांत आटोपला. सलामीच्या वैभव सूर्यवंशीने 44 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 56, अंबरीशने 71 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 53, मल्होत्राने 85 चेंडूत 10 चौकारांसह 63 धावा आणि कर्णधार म्हात्रेने 5 चौकारांसह 32 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे आर्ची वॉनने 84 धावांत 6 गडी बाद केले. ग्रीनने 67 धावांत 2 तर मिंटोने 25 धावांत 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक : भारत प. डाव 540, इंग्लंड प. डाव 439, भारत दु. डाव 57.4 षटकात सर्वबाद 248 (सूर्यवंशी 56, मल्होत्रा 63, अंबरीश 53, म्हात्रे 32, आर्ची वॉन 6-84, ग्रीन 2-67)









