विहान मल्होत्राचे शतक, म्हात्रेचे अर्धशतक, राल्फी अल्बर्टचे 6 बळी
वृत्तसंस्था / चेम्सफोर्ड
यजमान इंग्लंड आणि भारत 19 वर्षांखालील वयोगटाच्या युवा संघामध्ये येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने भारतावर पहिल्या डावात 30 धावांची आघाडी मिळविली. भारतीय युवा संघाच्या पहिल्या डावात विहान मल्होत्राने दमदार शतक (120) तर कर्णधार म्हात्रेने अर्धशतक (80) झळकविले.
या सामन्यात इंग्लंड युवा संघाचा डाव 81.3 षटकात 309 धावांवर आटोपला. इंग्लंड युवा संघाने 7 बाद 229 या धावसंख्येवरुन तिसऱ्यादिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे तीन गडी 80 धावांची भर घालत तंबूत परतले. इंग्लंडच्या डावामध्ये इकनाश सिंगने 115 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांसह 117 धावा जमविल्या. कर्णधार रिवने 79 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 59, मिंटोने 89 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 46, मेसने 5 चौकारांसह 31 तर आर्यन सावंतने 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. भारतीय युवा संघातर्फे नमन पुष्पकने 76 धावांत 4 तर आदित्य रावत आणि अंबरीश यांनी प्रत्येकी 2 तसेच हेनील पटेल व मल्होत्रा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
भारताच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. सलामीचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी लवकर बाद झाला. त्याने 14 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा जमविल्या. कर्णधार म्हात्रे व मल्होत्रा यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 133 धावांची भागिदारी केली. कर्णधार म्हात्रेने 90 चेंडूत 1 षटकार आणि 14 चौकारांसह 80 धावा जमविल्या. कुंडू आणि राहुल कुमार यांना आपले खातेही उघडता आले नाही. पांगलियाने 35 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 28 धावा जमविल्या. चौहानने 36 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 23 धावा केल्या. भारतीय युवा संघाचा डाव 58.1 षटकात 279 धावांवर आटोपला. इंग्लंड युवा संघातील अलबर्टने 53 धावांत 6 तर मेसने 17 धावांत 2 तसेच फ्रेंच आणि ग्रीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड युवा संघ प. डाव 81.3 षटकात सर्वबाद 309 (इकनेश सिंग 117, रिव 59, मिंटो 46, मेस 31, नमन पूष्पक 4-76, रावत व अंबरीश प्रत्येकी 2 बळी, पटेल, मल्होत्रा प्रत्येकी 1 बळी), भारत युवा संघ प. डाव 58.1 षटकात सर्वबाद 279 (मल्होत्रा 120, म्हात्रे 80, सूर्यवंशी 20, पांगलिया 28, चौहान 23, अलबर्ट 6-53, मेस 2-17, फ्रेंच व ग्रीन प्रत्येकी 1 बळी)









