वृत्तसंस्था / बेसील
2025 च्या महिलांच्या युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद विद्यमान विजेत्या इंग्लंड संघाने पुन्हा स्वत:कडे राखले. येथे रविवारी झालेल्या अटितटीच्या अंतिम सामन्यात इंग्लंने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. निर्धारीत वेळेत आणि त्यानंतरच्या जादा कालावधीत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते.
हा अंतिम सामना अपेक्षेप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा ठरला. या सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर मध्यंतरापर्यंत इंग्लंड पिछाडीवर होता. पण त्यानंतर उत्तराधार्थ इंग्लंड संघातील बदली खेळाडूंनी दर्जेदार खेळ करत आपल्या संघाला स्पेनशी बरोबरी साधून दिली. इंग्लंड संघातील चोले केलीचा खेळ दर्जेदार झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये केलीच्या निर्णायक फटक्याच्या जोरावर इंग्लंडने स्पेनचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत 5 दिवसांपूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत केलीची कामगिरी निर्णाय ठरली होती. रविवारच्या अंतिम सामन्यात इंग्लंडची गोलरक्षिका अॅना हॅम्टनने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनच्या कॅलेडेन्टी आणि बोनामती यांचे फटके अचूकपणे थोपविले. तर स्पेन संघातील बदली खेळाडू सलमा पॅरालुलोचा पेनल्टी शूटआऊटमधील फटका गोलपोस्टच्या बऱ्याच बाहेरुन गेला. इंग्लंड महिला फुटबॉल संघाचा खेळ दर्जेदार झाल्याने या संघाची प्रशिक्षिका सेरीना विगमनने खेळाडूंचे कौतुक केले आहे. इंग्लंड महिला संघाने आता सलग तीनवेळा युरो चषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
या अंतिम सामन्यात मध्यंतरापर्यंत स्पेनने इंग्लंडवर आघाडी मिळविल्यानंतर 57 व्या मिनिटाला केलीच्या पासवर अॅलिसीया रुसोने इंग्लंडला बरोबरी साधून दिली. स्पेनचा पहिला गोल 25 व्या मिनिटाला ओना बॅटलेने केला होता. स्पेन संघाला या स्पर्धेच्या इतिहासात अद्याप जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने फिफाची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. इंग्लंड संघातील केलीने तीन वर्षांपूर्वी विम्बलेच्या स्टेडियमध्ये जर्मनीविरुद्धच्या सामन्यात निर्णायक गोल जादावेळेत नोंदविला होता. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधल्यानंतर पंचांनी जादावेळेचा अवलंब केला. या कालावधीत स्पेनचा खेळ इंग्लंडच्या तुलनेत अधिक दर्जेदार झाला. इंग्लंडची कर्णधार विलियमसनने स्पॉट किकवरुन मारलेला फटका स्पेनच्या गोलरक्षकाने थोपविला. या जादावेळेच्या कालावधीत पुन्हा दोन्ही संघांमध्ये गोलकोंडी कायम राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडच्या गोलरक्षकाने स्पेनचे दोन फटके थोपविले तर त्यांच्या एका खेळाडूचा पेनल्टीवरील फटका गोलपोस्टच्या बाहेरुन गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडने तीन गोल नोंदवून स्पेनचे आव्हान संपुष्टात आणले. प्रशिक्षक विगमनच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या महिला फुटबॉल संघाने 2017, 2022 आणि 2025 साली सलग तीनवेळा युरो चषकावर आपले नाव कोरले आहे.









