इंग्लंडची डॅनी वॅट सामनावीर, टी-20 मालिकेत 1-1 बरोबरी
वृत्तसंस्था /लंडन
सामनावीर डॅनी वॅटच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर अॅशेस मालिकेतील येथे सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत बुधवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा केवळ तीन धावांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या विजयामुळे इंग्लंडच्या महिला संघाचे या मालिकेतील आव्हान जीवंत राहिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या एलीस पेरीचे नाबाद अर्धशतक वाया गेले. इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाला या अॅशेस मालिकेतील एकमेव कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव करून विजयी सलामी दिली होती. आता या मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 20 षटकात 9 बाद 186 धावा जमवल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 8 बाद 183 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना थोडक्यात गमवावा लागला.
इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या डॅनी वॅटने 46 चेंडुत 13 चौकारासह 76 धावा झळकवताना डंक्लेसमवेत पहिल्या गड्यासाठी 6.4 षटकात 57 धावांची भागीदारी केली. डंक्लेने 19 चेंडूत 3 चौकारासह 23 धावा जमवल्या. डंक्ले बाद झाल्यानंतर नॅट स्किव्हेर ब्रंटने वॅटसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 43 धावांची भर घातली. ब्रंटने 18 चेंडूत 4 चौकारासह 23 धावा जमवल्या. ब्रंट बाद झाली त्यावेळी इंग्लंडची स्थिती 11.2 षटकात 2 बाद 100 अशी होती. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडचे चार फलंदाज लवकर बाद झाले. कॅप्सेने 1 चौकारासह 5 धावा जमवल्या. कर्णधार नाईटला आपले खाते उघडता आले नाही. जोन्सने 3 तर गिब्सनने 1 धाव जमवली. डॅनी वॅट सातव्या गड्याच्या रुपात तंबूत परतली. इक्लेस्टोनने 12 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 22 तर ग्लेनने 8 चेंडूत 2 चौकारासह 10 धावा जमवल्या. इंग्लंडच्या डावात 1 षटकार आणि 25 चौकार नोंदवले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे सदरलँडने 28 धावात 3 तर गार्डनरने 2 तसेच ब्राऊन, मॅकग्रा आणि पेरी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार हिली आणि बेथ मुनी यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला चांगली सुरुवात करून देताना 38 चेंडूत 59 धावांची भागीदारी केली. कर्णधार हिलीने 19 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 37 तर मुनीने 24 चेंडूत 2 चौकारासह 22 धावा जमवल्या. मॅकग्रा आणि गार्डनर या दोन फलंदाज अनुक्रमे 4 आणि 9 धावांत तंबूत परतले. हॅरीसने 1 चौकारासह 9 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 12.2 षटकात 96 धावावर तंबूत परतला होता. एलीस पेरीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 27 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह नाबाद 51 धावा झळकवल्या. मात्र तिला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. पेरीचे अर्धशतक वाया गेले. सदरलँडने 12 चेंडूत 4 चौकारासह 20 तर वेरहॅमने 11 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 19 धावा जमवल्या. जोनासेनने 1 चौकारासह 6 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 6 षटकार आणि 20 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे ग्लेन आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 2 तर बेल, नॅट स्किव्हेर ब्रंट आणि गिब्सन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ या अॅशेस मालिकेत इंग्लंडवर 6-2 अशा गुणांनी आघाडी मिळवली आहे. या दुसऱ्या सामन्याला सुमारे 20 हजार शौकीन उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 20 षटकात 9 बाद 186 (वॅट 76, डंक्ले 23, नॅट स्किव्हेर 23, इक्लेस्टोन 22, ग्लेन 10, अवांतर 21, सदरलँड 3-28, गार्डनर 2-39, ब्राऊन, मॅकग्रा आणि पेरी प्रत्येकी एक बळी)
ऑस्ट्रेलिया 20 षटकात 8 बाद 183 (हिली 37, मुनी 22, गार्डनर 9, मॅकग्रा 4, पेरी नाबाद 51, सदरलँड 20, वेरहॅम 19, जोनासेन 6, अवांतर 6, ग्लेन 2-27, इक्लेस्टोन 2-35, बेल, डीन, गिब्सन प्रत्येकी एक बळी).









