पाच सामन्यांची टी-20 मालिका : न्यूझीलंड 15 धावांनी पराभूत
वृत्तसंस्था/ नेल्सन
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत येथे शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने यजमान न्यूझीलंडचा 15 धावांनी पराभव करत आपला सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयामुळे इंग्लंडने न्यूझीलंड महिला संघावर 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. इंग्लंडच्या हिदर नाईटला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंड महिला संघाने 20 षटकात 7 बाद 149 धावा जमवल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 20 षटकात 8 बाद 134 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 15 धावांनी गमवावा लागला.
सध्या इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर टी-20 मालिका खेळत आहे. इंग्लंड संघाने या आपल्या दौऱ्याला विजयाने शानदार प्रारंभ करताना या मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या डावामध्ये कर्णधार नाईटने 40 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 56 धावा जमवल्या. ब्युमाँटने 13 चेंडूत 3 चौकारांसह 19, बुचरने 20 चेंडूत 1 चौकारांसह 12, गिब्सनने 12 चेंडूत 2 चौकारांसह 14, चार्ली डीनने 14 चेंडूत 1 चौकारांसह 16 आणि सारा ग्लेनने 6 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 13 धावा जमवल्या. इंग्लंडच्या डावात 2 षटकार आणि 14 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडच्या डावामध्ये पहिल्या पॉवरप्लेमध्ये 6 षटकात 34 धावा जमवताना 2 गडी गमवले. इंग्लंडचे अर्धशतक 55 चेंडूत, शतक 95 चेंडूत फलकावर लागले. न्यूझीलंडतर्फे सोफी डिव्हाईन आणि मेयर यांनी प्रत्येकी 2 तर ताहुहु, जोनास आणि अॅमेलिया केर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावामध्ये अॅमेलिया केरने 36 चेंडूत 5 चौकारांसह 44, बेट्सने 13 चेंडूत 4 चौकारांसह 19, डिव्हाईनने 14 चेंडूत 2 चौकारांसह 17, ग्रीनने 16 धावा तर ताहुहुने 9 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 15 धावा जमवल्या. न्यूझीलंडच्या डावात 13 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे लॉरेनबेल आणि चार्ली डिन यांनी प्रत्येकी 2 तसेच गिब्सन, स्मिथ, ग्लेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. न्यूझीलंडने पहिल्या पॉवरप्लेमधील 6 षटकात 48 धावा जमवताना 2 गडी गमवले. न्यूझीलंडचे अर्धशतक 41 चेंडूत तर शतक 87 चेंडूत फलकावर लागले.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकात 7 बाद 149 (नाईट नाबाद 56, ब्युमाँट 19, बुचर 12, गिब्सन 14, डीन 16, ग्लेन नाबाद 13, अवांतर 6, डिव्हाईन 2-30, मेयर 2-25, ताहुहु, जोनास, अॅमेलिया केर प्रत्येकी एक बळी), न्यूझीलंड 20 षटकात 8 बाद 134 (अॅमेलिया केर 44, बेट्स 19, डिव्हाईन 17, ग्रीन 16, ताहुहु नाबाद 15, मेयर नाबाद 9, अवांतर 9, बेल 2-24, डीन 2-28, गिब्सन, स्मिथ, ग्लेन प्रत्येकी एक बळी).









