वृत्तसंस्था/ पोश्चेस्ट्रुम (दक्षिण आफ्रिका)
येथे सुरू असलेल्या 2024 च्या आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ब गटातील झालेल्या सामन्यात इंग्लंडने स्कॉटलंडचा 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या बेन मॅकीनेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडचा डाव 49.2 षटकात 174 धावात आटोपला. त्यानंतर इंग्लंडने 26.2 षटकात 3 बाद 178 धावा जमवित आपला विजय नोंदविला.
स्कॉटलंडच्या डावामध्ये सलामीच्या डंकने 70 चेंडूत 3 चौकारांसह 40 कर्णधार गोल्डने 61 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 48, युझेर अहमदने 1 चौकारासह 12, झोन्सने 1 चौकारासह 13 तर ब्रिग्जने 18 धावा जमविल्या. स्कॉटलंडला अवांतर 26 धावा मिळाल्या. त्यांच्या डावामध्ये 1 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे बेनकेनस्टीनने 41 धावात 3 तसेच फरहान अहमदने 22 धावात 3, मॉर्गन, केली, डिनेली यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावाला डिनेली आणि कर्णधार बेन मॅकेनी यांनी दमदार सुरूवात करुन देताना 15.4 षटकात 106 धावांची शतकी भागिदारी केली. स्कॉटलंडच्या इब्राहिम फझलने डिनेलीला झेलबाद केले. त्याने 50 चेंडूत 3 चौकारांसह 40 धावा जमविल्या. नोहा थेनने 28 चेंडूत 2 चौकारांसह 22 धावा केल्या. कर्णधार मॅकेनीने 68 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांसह 88 धावा केल्या. थेनने 2 चौकारांसह 22 धावा केल्या. स्कॉटलंडतर्फे इब्राहिम फैझलने 30 धावात 2 तर आदी हेगडेने 36 धावात 1 गडी बाद केला. इंग्लंडच्या डावात 3 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक – स्कॉटलंड 49.2 षटकात सर्व बाद 174 (डंक 40, ओवेन गोल्ड 48, युझेर अहमद 12, जोन्स 13, ब्रिग्ज 18, फरहान अहमद आणि बेनकेनस्टीन प्रत्येकी 3 बळी, मॉर्गन, केली आणि डिनेली प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 26.2 षटकात 3 बाद 178 (डिनेली 50 चेंडूत 3 चौकारांसह 40, मॅकेनी 68 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांसह 88, थेन 2 चौकारांसह 22, हमजा शेख नाबाद 6, बेनकेनस्टीन नाबाद 11, अवांतर 11, आदी हेगडे 1-36, इब्राहिम फैझल 2-30).









