न्यूझीलंडवर 79 धावांनी विजय, सामनावीर लिव्हिंगस्टोन नाबाद अर्धशतक, टोपले-विलीचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/ साउदम्प्टन, यूके
सामनावीर लियाम लिव्हिंगस्टोनचे शानदार नाबाद अर्धशतक आणि डेव्हिड विली व रीस टोपले यांच्या भेदक माऱ्याच्या बळावर इंग्लंडने येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडवर 79 धावांनी विजय मिळवित चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
34 षटकांच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळाल्यावर इंग्लंडने निर्धारित षटकांत 7 बाद 226 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव 26.5 षटकांत 147 धावांत गुंडाळत विजय साकार केला. इंग्लंडची खराब सुरुवात झाली होती. पुनरागमन करणाऱ्या बोल्टच्या भेदक जलद माऱ्यासमोर त्यांची स्थिती 4.2 षटकांतच 3 बाद 8 अशी केविलवाणी झाली होती. जॉनी बेअरस्टो (6), जो रूट (0) व बेन स्टोक्स (1) लवकर बाद झाले. कर्णधार जोस बटलरने हॅरी ब्रुकच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ब्रुक 2 धावांवर बाद झाल्यानंतर 7.2 षटकांत 4 बाद 28 अशी त्यांची स्थिती झाली. मोईन अलीकडून चांगली साथ मिळाल्यावर बटलरने डाव सावरण्यास सुरुवात केली असतानाच सँटनरने त्याचा 30 धावांवर त्रिफळा उडविला. इंग्लंडने 11.1 षटकांत अर्धशतकी मजल मारली. लिव्हिंगस्टोने थोडीफार पडझड रोखत 13 व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले.
मोईन अलीही नंतर 33 धावांवर बाद झाला. फिलिप्सने त्याचा पॉईंटवर अप्रतिम झेल टिपला. मोईन व लियाम यांनी 48 धावांची भागीदारी केली. लियामने नंतर 47 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि संघाचे दीडशतक 27 व्या षटकात फलकावर लागले तर सॅम करन व लियाम यांनी 112 धावांची शतकी भागीदारी 69 चेंडूत पूर्ण केली आणि 34 षटकांअखेर इंग्लंडने 7 बाद 226 धावांपर्यंत मजल मारली. बोल्टने 3, साऊदीने 2 बळी मिळविले.
आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचीही खराब सुरुवात झाली आणि डॅरील मिचेल (57) व विली यंग (33) यांच्याव्यतिरिक्त इतरांना भरीव योगदान देता आले नाही. त्यांचा डाव 26.5 षटकांतच 147 धावांत आटोपला. विली व टोपले यांनी प्रत्येकी 3, मोईन अलीने 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 34 षटकांत 7 बाद 226 : लिव्हिंगस्टोन 78 चेंडूत नाबाद 95, बटलर 25 चेंडूत 30, मोईन अली 32 चेंडूत 33, सॅम करन 35 चेंडूत 42, बोल्ट 3-37, साऊदी 2-65. न्यूझीलंड 26.5 षटकांत सर्व बाद 147 : मिचेल 52 चेंडूत 57, यंग 39 चेंडूत 33, लॅथम 22 चेंडूत 19, विली 3-34, टोपले 3-37.









