लंडन (युके) / वृत्तसंस्था
यजमान इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून (गुरुवार दि. 25) दुसरी कसोटी खेळवली जाणार असून अमिरात ओल्ड ट्रफोर्ड मैदानावरील या लढतीसाठी इंग्लंडने मॅथ्यू पॉट्सऐवजी ऑलि रॉबिन्सनला संधी दिली आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत तूर्तास द. आफ्रिकन संघ 1-0 फरकाने आघाडीवर आहे. यापूर्वी लॉर्ड्सवर संपन्न झालेल्या पहिल्या कसोटीत द. आफ्रिकाने डाव व 12 धावांनी दणकेबाज विजय संपादन केला होता. ती लढत केवळ तीनच दिवसात निकाली झाली होती. आता दुसऱया कसोटी सामन्यात आज पहिल्या दिवसाच्या खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होणार असून सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी लिव्ह ऍपवरुन केले जाणार आहे. उभय संघातील तिसरी व शेवटची कसोटी दि. 8 सप्टेंबरपासून खेळवली जाणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले गेले आहे.









