पहिली कसोटी तिसरा दिवस : ब्रॉड, रॉबिन्सनचे प्रत्येकी 3 बळी, हेड, कॅरे यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
अॅशेस मालिकेतील येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर पहिल्या डावात 7 धावांची नाममात्र आघाडी मिळवली. रविवारी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव उपाहारावेळी 386 धावात आटोपला.
या कसोटीत इंग्लंडने आपला पहिला 8 बाद 393 धावावर घोषित केला होता. इंग्लंडच्या पहिल्या डावात रुटचे नाबाद शतक तसेच क्रॉले आणि बेअरस्टो यांची अर्धशतके वैशिष्ट्यो ठरली होती. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात चिवट फलंदाजीचे दर्शन घडवले. दरम्यान इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना धावांची गती राखता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात उस्मान ख्वाजाने शतक झळकवले तर हेड आणि कॅरे यांनी अर्धशतके नोंदवली.

ऑस्ट्रेलियाने 5 बाद 311 या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. इंग्लंडच्या अँडरसनने कॅरेचा त्रिफळा उडवला. कॅरेने 99 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारासह 66 धावा जमवताना ख्वाजासमवेत सहाव्या गड्यासाठी 118 धावांची शतकी भागीदारी केली. इंग्लंडच्या अँडरसन, ब्राँड आणि रॉबिन्सन यांनी शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजी केल्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फटकेबाजी करणे कठीण जात होते. रॉबिन्सनने उस्मान ख्वाजाला यॉर्करवर फसवले. ख्वाजा चेंडू तटवण्याच्या नादात त्रिफळाचित झाला. ख्वाजाने 321 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारासह 141 धावा जमवल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांना रविवारच्या खेळातील पहिल्या सत्रात मिळालेले हे दुसरे यश ठरले. रॉबिन्सनने लियॉनला डकेटकरवी झेलबाद केले. त्याने केवळ एक धाव जमवली. नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला बोलँड ब्राँडच्या गोलंदाजीवर पोपकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याला खातेही उघडता आले नाही. कर्णधार पॅट कमिन्सने नेहमीप्रमाणे आक्रमक आणि उत्तुंग फटकेबाजी केली. त्याने 62 चेंडूत 3 षटकारासह 38 धावा जमवल्या. रॉबिन्सनने कमिन्सला स्टोक्सकरवी झेलबाद केले. कमिन्स दहाव्या गड्याच्या रुपात तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 116.1 षटकात 386 धावावर आटोपला. इंग्लंडने 7 धावांची नाममात्र आघाडी मिळवली. इंग्लंडतर्फे ब्रॉड आणि रॉबिन्सन यांनी प्रत्येकी 3 तर मोईन अलीने 2 तसेच स्टोक्स व अँडरसन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. ऑस्ट्रेलियाचे शेवटचे पाच गडी 57 धावांची भर घालत तंबूत परतले.
उपाहारानंतर इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावाला सावध सुरुवात केली. क्रॉले आणि डकेट या सलामीच्या जोडीने 6.5 षटकात बिनबाद 26 धावा जमवल्या असताना पावसाला प्रारंभ झाल्याने खेळ थांबवण्यात आला. क्रॉले 18 चेंडूत 7 धावावर तर डकेट 23 चेंडूत 1 चौकारासह 18 धावावर खेळत होते. 9 षटकांचा खेळ वाया गेल्यानंतर पाऊस थांबल्याने खेळ पुन्हा सुरू करण्यात आला. पण आणखी 3.4 षटकांचा खेळ झाल्यावर पुन्हा पावसास सुरुवात झाल्याने खेळ थांबवावा लागला. या अवधीत इंग्लंडने 2 धावांची भर घालत दोन बळी गमविले. क्रॉले 7 व डकेट 19 धावांवर बाद झाले. खेळ थांबवण्यात आला तेव्हा इंग्लंडने 10.3 षटकांत 2 बाद 28 धावा जमविल्या होत्या. रूट व पोप शून्यावर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प. डाव 8 बाद 393 डाव घोषित, ऑस्ट्रेलिया प. डाव 116.1 षटकात सर्वबाद 386 (वॉर्नर 2 चौकारांसह 9, ख्वाजा 321 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांसह 141, लाबुशेन 0, स्टिव्ह स्मिथ 16, हेड 1 षटकार आणि 8 चौकारांसह 50, ग्रीन 68 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 38, कॅरे 99 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 66, कमिन्स 62 चेंडूत 3 षटकारासह 38, लियॉन 1, बोलँड 0, हॅझलवूड नाबाद 1, अवांतर 26, स्टुअर्ट ब्रॉड 3-68, रॉबिनसन 3-55, अँडरसन 1-53, मोईन अली 2-147, स्टोक्स 1-33).
इंग्लंड दु. डाव 10.3 षटकात 2 बाद 26 (क्रॉले 7, डकेट 19, रूट खेळत आहे 0, पोप खेळत आहे 0, अवांतर 2). (चहापानापर्यंत)
ग्रीनच्या एक हजार धावा
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनने कसोटी क्रिकेटमध्ये आपला 1000 धावांचा टप्पा गाठला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ग्रीनने शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी 68 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 38 धावा जमवल्या. मोईन अलीने त्याचा त्रिफळा उडवला त्याने आतापर्यंत 22 कसोटीत 31 डावात 36.07 धावांच्या सरासरीने 1010 जमवल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. 114 ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. ग्रीनने गोलंदाजीत 26 गडी बाद केले आहेत. 27 धावात 5 बळी त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यावर ग्रीन हा सर्वात यशस्वी अष्टपैलू ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियात 13 सामन्यातील 20 डावात 547 धावा जमवल्या असून त्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 84 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच अष्टपैलूंनी अधिक धावा भारताविरुद्ध जमवल्या आहेत. ग्रीनने भारताविरुद्ध 7 कसोटीत 36.54 धावांच्या सरासरीने 402 धावा जमवल्या आहेत. तसेच त्याने भारताविरुद्ध सर्वोच्च 114 धावा तसेच एक अर्धशतकही झळवले आहे.
मोईन अलीला दंड
इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अली याला सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळताना त्याच्याकडून शिस्तपालन नियमाचा भंग झाल्याबद्दल आयसीसीने त्याला 25 टक्के दंड ठोठावला आहे.
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने मोईन अलीने मैदानावरील पंचांची परवानगी घेण्यापूर्वी वेदनाशामक स्प्रेचा वापर केला होता. या कारणामुळे त्याच्याकडून शिस्तपालन नियमाचा भंग झाल्याचे सामनाधिकाऱ्यांनी सांगितले. मोईन अलीने स्प्रे (क्रीम) याचा वापर केवळ हाताला कोरडेपणा येण्यासाठी केला होता असे त्याने सामनाधिकाऱ्याशी बोलताना सांगितले. मोईन अलीच्या या खुलाशाने सामनाधिकारी समाधानी असल्याचे सांगण्यात आले पण याचा वापर करताना मैदानावरील पंचांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या 24 महिन्यांच्या कालावधीत इंग्लंडच्या अष्टपैलू मोईन अलीकडून हा पहिला गुन्हा नोंदवला गेला आहे. आता त्याला मिळणाऱ्या मानधन रकमेतील 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.









