इंग्लंडने रोखली ऑस्ट्रेलियाची घोडदौड, स्पेनचा स्वीडनला धक्का, 2003 नंतर प्रथमच ‘ऑल-युरोपियन फायनल’
वृत्तसंस्था/ सिडनी
इंग्लंडने बुधवारी सहयजमान ऑस्ट्रेलियावर 3-1 असा विजय मिळवत महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दिशेने प्रथमच आगेकूच केली असून ऑस्ट्रेलियाची स्पर्धेतील आकर्षक घौडदौड संपुष्टात आणली आहे. दुसरीकडे, स्पेनने मंगळवारी ईडन पार्क येथे स्वीडनविऊद्ध 2-1 असा विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. रविवारी ‘स्टेडियम ऑस्ट्रेलिया’वर इंग्लंडप्रमाणे स्पेनही अंतिम सामन्यात पहिल्यांदाच खेळणार असून 2003 नंतरची ही पहिलीच ‘ऑल-युरोपियन फायनल’ असेल.
ऑस्ट्रेलियाची सुपरस्टार सॅम केर स्पर्धेत पहिल्यांदाच बदली खेळाडू म्हणून न उतरता सामन्याच्या सुरुवातीपासून खेळली आणि तिने गोलही केला. परंतु युरोपियन विजेत्या इंग्लंडला रोखण्यासाठी ते पुरेसे ठरले नाही. 36 व्या मिनिटाला एला टुनेने गोल करून इंग्लंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आणि पहिल्या सत्रात त्यांनी वर्चस्व राखले.
पण 63 व्या मिनिटाला केरच्या बरोबरी साधून देणाऱ्या गोलाने 75 हजारांपेक्षा जास्त संख्येने उपस्थित प्रेक्षकांच्या काही प्रमाणात आशा जागविल्या. त्यानंतर लॉरेन हेम्पने 71 व्या मिनिटाला सामन्यात इंग्लंडला पुन्हा आघाडी मिळवून देणारा गोल केला आणि अलेसिया ऊसोला सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना अचूक चेंडू पुरविला. रुसोने केलेल्या गोलामुळे ऑस्ट्रेलियाच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. ऑस्ट्रेलिया आता शनिवारी ब्रिस्बेनमध्ये तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत स्वीडनशी खेळणार आहे.
इंग्लंडच्या प्रशिक्षक सरिना विगमन यांनी त्याद्वारे एक वेगळी कामगिरी नोंदविली आहे. महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन देशांच्या संघांच्या प्रशिक्षक राहण्याचा मान मिळालेल्या त्या पहिल्या प्रशिक्षक ठरल्या आहेत. 2019 मध्ये त्यांच्या प्रशिक्षणाखालील नेदरलँड्स संघाने अंतिम फेरी गाठली होती आणि तिथे त्यांना अमेरिकेने पराभूत केले होते. इंग्लंड संघाची ही महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याची सलग तिसरी खेप होती, तर ऑस्ट्रेलिया प्रथमच अंतिम चार संघांत पोहोचली होती. याची जाणीव विशेषत: पहिल्या सत्रात आणि शेवटच्या 20 मिनिटांत झाली.
इंग्लंडच्या आक्रमणाची धार जास्त होती आणि त्यांनी बराच काळ ऑस्ट्रेलियाला चेंडूवर ताबा मिळवून दिला नाही. ऑस्ट्रेलियाने गेल्या आठवड्याच्या शेवटी फ्रान्सवर 7-6 असा पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला होता आणि हा त्यांचा महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत चार वेळा गाठलेल्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिला विजय होता. स्पर्धेच्या पूर्वसंध्येला पोटरीच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे केरला सामन्याच्या सुरुवातीपासून मैदानात उतरण्याच्या बाबतीत पाच सामन्यांची प्रतीक्षा करावी लागली. या ‘सुपरस्टार स्ट्रायकर’ने तासाभरानंतर ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिल्यावर 82 व्या मिनिटाला हेडरवर गोल करून पुन्हा बरोबरी साधून देण्याची संधी तिला मिळाली होती. पण त्यावेळी हेडर क्रॉसबारवर आदळला.
स्पेनची स्वीडनवर मात

दुसऱ्या उपांत्य लढतीत स्पेनने पूर्वार्धात वर्चस्व गाजवले आणि स्वीडनपेक्षा अधिक चांगल्या संधी निर्माण केल्या. खेळाच्या 14 व्या मिनिटाला स्पेन आपले खाते उघडण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण त्यावेळी कार्मोनाचा फटका अगदी कमी फरकाने जाळ्यात जाण्यापासून हुकला. स्पेनच्या वर्चस्वाला स्वीडनने सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनीच गोलच्या दिशेने पहिला फटका हाणला. पण फ्रिडा रोल्फाचा हा प्रयत्न तिची क्लब सहकारी कॅटालिना कॉल हिने निष्फळ ठरविला. हा प्रयत्न उत्तरार्धात स्वीडनला प्रेरित करण्यास पुरेसा ठरला. त्यानंतर आक्रमणाच्या दडपणाचा सामना दोन्ही बाजूच्या गोलरक्षकांना करावा लागला.
स्पेनला 70 व्या मिनिटाला पहिला गोल करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली होती, पण रेडोंडोचा सहा यार्डवरून हाणलेला फटका बाहेर गेल्याने 0-0 अशी कोंडी कायम राहिली. त्यानंतर काही क्षणांतच पॅरालुएलो हिने स्वीडनच्या बचावात्मक त्रुटीचा फायदा घेत चेंडू जाळ्यात सारला आणि अत्यंत आवश्यक यश मिळवून दिले. पण स्पेनचा हा आनंद फार काळ टिकला नाही आणि सात मिनिटांनंतर ब्लॉमक्विस्टने स्वीडनचे आव्हान जिवंत राहण्यास मदत करताना गोलाची नोंद केली. त्यामुळे अतिरिक्त वेळेत सामना जाण्याची चिन्हे दिसू लागली होती.
पण स्पेनने लगेच प्रत्युत्तर देताना मिळविलेल्या कॉर्नरवर कर्णधार कार्मोनाने अप्रतिम प्रयत्नाद्वारे चेंडू गोलरक्षकावरून जाळीत सारला. गोलरक्षक मुसोविकने आपल्या परीने हा चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला होता आणि तिच्या बोटांचा स्पर्शही चेंडूला झाला होता. पण चेंडू बारच्या खालच्या बाजूस लागून रेषेच्या पलीकडे गेला. स्वीडनने त्यानंतर बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण स्पेनच्या अभेद्य बचावामुळे 2-1 अशी गोलसंख्या अबाधित राहिली.









