पुढील महिन्यात उभय संघात रंगणार वनडे व टी 20 मालिका : हॅरी ब्रूककडे नेतृत्वाची धुरा
वृत्तसंस्था/ लंडन
टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेनंतर इंग्लिश संघ आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या एकूण 2 मालिकांमधील 6 सामन्यांसाठी शनिवारी संघ जाहीर केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. हॅरी ब्रूककडे वनडे व टी 20 मालिकेसाठी नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आल्याचे ईसीबीकडून सांगण्यात आले.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे आणि टी 20 या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत. या दोन्ही मालिकेत हॅरी ब्रूक इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे. जोस बटलर याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हॅरी ब्रूकला व्हाईट बॉल कॅप्टन करण्यात आले आहे. दरम्यान, उभय संघात 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. तर 10 ते 14 सप्टेंबरमध्ये टी 20 मालिका खेळवण्यात येईल. आफ्रिकेविरुद्ध या मालिकेसाठी युवा तसेच अनुभवी खेळाडूंवर विश्वास ठेवत त्यांना संघात स्थान देण्यात आले आहे. जोफ्रा आर्चर, जोस बटलर, बेन डकेट हे स्टार खेळाडू दोन्ही मालिकेत खेळणार आहेत.
आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ – हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सन्नी बेकर, टॉम बॅटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, बेन डकेट, विल जॅक्स, साकिब महमूद, जेमी ओवरटन, आदिल राशिद, जो रूट आणि जेमी स्मिथ.
आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिकेसाठी इंग्लंड संघ – हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बॅटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, साकिब महमूद, जेमी ओवरटन, आदिल राशिद, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ आणि ल्यूक वुड.
उभय संघातील वनडे मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना, मंगळवार, 2 सप्टेंबर, लीड्स
- दुसरा सामना, गुरुवार, 4 सप्टेंबर, लंडन
- तिसरा सामना, रविवार, 7 सप्टेंबर, साउथम्पटन
टी 20 मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना, बुधवार, 10 सप्टेंबर, कार्डीफ
- दुसरा सामना, शुक्रवार, 12 सप्टेंबर, मँचेस्टर
- तिसरा सामना, रविवार, 14 सप्टेंबर, नॉटिगहॅम.
इंग्लंड आयर्लंडविरुद्ध टी 20 मालिका खेळणार
लंडन : इंग्लंडने शनिवारी दक्षिण आफ्रिका, आयर्लंड मालिकेसाठी संघ जाहीर केला. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अष्टपैलू जेकब बेथेलला पहिल्यांदाच इंग्लंड संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. जेव्हा बेथेल डब्लिनमध्ये संघाचे नेतृत्व करेल तेव्हा तो इंग्लंड पुरुष संघाचा सर्वात तरुण कर्णधार बनेल. दरम्यान, आयर्लंडविरुद्धची तीन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका डब्लिनमधील मालाहाइड येथे होणार आहे, ज्याचा पहिला सामना बुधवारी (17 सप्टेंबर) खेळला जाईल.









