मिचेल मार्शचे दमदार शतक, मार्क वूडचे पाच बळी
वृत्तसंस्था /लीड्स
अॅशेस मालिकेतील गुरुवारपासून येथे सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटीत मार्क वूड, ख्रिस वोक्स, ब्रॉड यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 263 धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाच्या डावात मिचेल मार्शने दमदार शतक (118) झळकाविले. या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडवर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा इंग्लंडच्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. पहिल्या षटकापासूनच ऑस्ट्रेलियाच्या डावाला गळती सुरु झाली. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल मार्शने एकाकी लढत देत 4 षटकार आणि 17 चौकारांच्या मदतीने 118 चेंडूत 118 धावा झळकाविल्याने ऑस्ट्रेलियाला 263 धावांपर्यंत मजल मारता आली. हेडने 5 चौकारांसह 39, स्टिव्ह स्मिथने 1 षटकार आणि 1 चौकारासह 22, लाबुशेनने 4 चौकारांसह 21, ख्वाजाने 2 चौकारांसह 13 तर मर्फीने 3 चौकारांसह 13 धावा जमविल्या.
उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 26 षटकात 4 बाद 91 धावा जमविल्या होत्या. पहिल्या षटकात ब्रॉडने वॉर्नरला 4 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर वूडच्या गोलंदाजीवर ख्वाजाचा 13 धावावर त्रिफळा उडाला. वोक्सने लाबुशेनला रुटकडे झेल देण्यास भाग पाडले. ब्रॉडने उपाहारापूर्वी ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का देताना स्मिथला यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद केले.
खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे शतक 28.1 षटकात फलकावर लागले. मिचल मार्श आणि हेड या जोडीने पाचव्या गड्यासाठी 165 धावांची भागिदारी केली. मार्शने 2 षटकार आणि 6 चौकारांसह आपले अर्धशतक 59 चेंडूत झळकाविले. ऑस्ट्रेलियाच्या 150 धावा 38.2 षटकात फलकावर लागल्या. हेड आणि मार्श यांनी पाचव्या गड्यासाठी शतकी भागिदारी 118 चेंडूत नोंदविली. ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा 45.1 षटकात फलकावर लागल्या. दरम्यान, मार्शने आपले शतक 102 चेंडूत 3 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने झळकाविताना हेड समवेत पाचव्या गड्यासाठी दीडशतकी भागिदारी 163 चेंडूत नोंदविली. चहापानापूर्वी वोक्सने मिचेल मार्शला झेलबाद केले. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने 5 बाद 240 धावा जमविल्या होत्या. मार्क वूडने चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रात अचूक गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचे शेपूट झटपट गुंडाळले. ऑस्ट्रेलियाच्या 250 धावा 56.6 षटकात नोंदविल्या गेल्या. मार्श बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे शेवटचे 5 फलंदाज केवळ 23 धावात बाद झाले. 60.4 षटकात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर आटोपला. इंग्लंडतर्फे मार्क वूडने 34 धावात 5, वोक्सने 73 धावात 3 तर ब्रॉडने 58 धावात 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया प. डाव 60.4 षटकात सर्व बाद 263 (मिचेल मार्श 118, हेड 39, स्मिथ 22, लाबुशेन 21, ख्वाजा 13, वॉर्नर 4, कॅरे 8, स्टार्क 2, कमिन्स 0, मर्फी 13, अवांतर 23, मार्क वूड 5-34, वोक्स 3-73, ब्रॉड 2-58).









