वृत्तसंस्था / लंडन
मंगळवारी इंग्लंड 2026 च्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणारा युरोपमधील पहिला देश ठरला. परंतु हंगेरीविरुद्ध स्टॉपेजटाईम बरोबरीचा सामना गमावल्यानंतर ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि पोर्तुगालला स्पर्धेत स्थान मिळविण्याची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
इंग्लंडने लॅटव्हियावर 5-0 असा विजय मिळविला. कर्णधार हॅरी केनने पहिल्या हाफमध्ये दोनदा गोल करुन दोन सामने शिल्लक असताना त्यांच्या गटात पहिले स्थान निश्चित केले. सलग आठव्या वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या इंग्लिश संघाने जर्मन प्रशिक्षक थॉमस टचेल यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंतच्या पात्रता फेरीतील सहा सामन्यांमध्ये एकही गोल घेतलेला नाही. ‘कधीकधी आम्ही ते सोपे असल्याचे दाखवतो, असे केन म्हणाला. ज्यांने या हंगामात इंग्लंड आणि बायर्न म्युनिकसाठी एकूण 21 गोल केले आहेत. ‘पण हे गट आणि सामने कठीण असू शकतात. आम्ही गती टिकवून ठेवण्यासाठी कोणाविरुद्धही खेळलो तरी आम्ही उच्च दर्जाबद्दल बोलतो आणि ते येथे दिसून आले,’ असे केन म्हणाला.
गेल्या दोन विश्वचषकांमध्ये पात्रता मिळवण्यात अपयशी ठरलेल्या इटलीने तणावपूर्ण सामन्यात इस्त्रायलला 3-0 ने हरवून प्लेऑफमध्ये किमान स्थान निश्चित केले. हा सामना पोलीस आणि लष्कराच्या प्रचंड उपस्थितीत खेळला गेला आणि त्याआधी अंदाजे 10000 लोक उपस्थित असलेल्या पॅलेस्टिनी समर्थक मोर्चात सहभागी झाले. गाझामध्ये दोन वर्षाच्या युद्धाला विराम देणाऱ्या युद्धबंदी करारानंतरही हा सामना सर्वाधिक जोखीम श्रेणीत ठेवण्यात आला. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अझुरी नॉर्वेपेक्षा तीन गुणांनी मागे आहे. ज्याचा गोलफरक खूपच चांगला आहे. पुढील महिन्यात दोन्ही संघाचे दोन सामने शिल्लक आहेत. त्यात इटलीमध्ये एकमेकांविरुद्ध सामना समाविष्ट आहे. स्पेनने बेल्गेरियाला 4-0 ने हरवून पात्रता मोहीमेची 100 टक्के सुरूवात कायम ठेवत आपल्या गटात अव्वल स्थान कायम ठेवले. तुर्कीपेक्षा तीन गुणांनी पुढे. तुर्कीनेही घरच्या मैदानावर जॉर्जियावर 4-1 असा विजय मिळवला आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संधी निर्माण केली आहे.









