वृत्तसंस्था/ कोलकाता
नियमित कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे आणि बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसनच्या माघारीमुळे अडचणीत आलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याला आपल्या चमूत ओढले आहे. मात्र केकेआरने आज गुऊवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविऊद्धच्या सामन्यासाठी रॉय उपलब्ध असेल की नाही हे स्पष्ट केलेले नाही.
कोलकाता नाईट रायडर्सने इंग्लंडच्या जेसन रॉयला यंदाच्या आयपीएलसाठी रु. 1.5 कोटीच्या ‘बेस प्राईस’हून जास्त म्हणजे 2.8 कोटी रु. देऊन करारबद्ध केले असल्याचे त्यांनी बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे. गुजरात लायन्सतर्फे 2017 च्या आयपीएलमध्ये प्रथम भाग घेतलेला रॉय शेवटचा सामना 2021 च्या हंगामात सनरायजर्स हैदराबादतर्फे खेळला होता. त्यावेळी तो पाच सामने खेळला होता आणि एका अर्धशतकासह त्याने 150 धावा काढल्या होत्या.
सदर 32 वर्षीय खेळाडू इंग्लंडसाठी 64 टी-20 सामने खेळलेला असून आठ अर्धशतकांसह 137.61 च्या स्ट्राईक रेटने 1522 धावा केलेल्या आहेत. रॉय हा अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज रहमानुल्ला गुरबाजची जागा घेण्याची शक्यता आहे. गुरबाजने पंजाब किंग्जविऊद्धच्या सामन्यात सलामीला येऊन 16 चेंडूंत 22 धावा केलेल्या असल्या, तरी त्यांच्याकडे एन. जगदीशनच्या रूपाने यष्टीरक्षक आहे.









